दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनातला पहिला बळी, अश्रुधुराने जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा शेतकरी येऊन थडकले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाने दिल्लीची सीमा धुसमुसू लागली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी सरकारच्या बैठका सुरु असतानाच या आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
नवी दिल्ली | दि. 16 फेब्रुवारी 2024 : पंजाब येथील शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा देत सुरु केलेल्या आंदोलनाचा आज चौथा ( 16 फेब्रुवारी ) दिवस आहे. या निदर्शना दरम्यान अश्रुधुरांच्या नळकांड्यांनी जखमी झालेल्या ज्ञान सिंह या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. गुरुदासपुर येथील रहीवासी असलेल्या ज्ञान सिंह या आंदोलनातला पहिला बळी ठरला आहे. शेतकऱ्यांनी आज भारत बंदचे आवाहन केले होते. याचा काही भागात प्रभाव जाणवत आहे.
शेतकऱ्यांनी दिल्लीला जाण्यासाठी मोर्चा काढल्याने दिल्लीला लष्करी छावणीचे स्वरुप आले आहे. या दिल्लीच्या चारी दिशेने सरकारने आंदोलकांना रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त केला आहे. शेतकऱ्यांनी किमान हमी भावासह अनेक प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन छेडले आहे. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरु झाल्याने सरकार अडचणीत सापडले आहे. दिल्ली पोलिसांनी आणि केंद्रीय रिझर्व्ह फोर्सने केलेल्या अश्रुधुरांच्या माऱ्यांमध्ये शंभू सीमेवर जखमी झालेल्या ज्ञानसिंग या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हे शेतकरी गुरुदासपूरच्या चाचौकी गावचे रहिवासी असून यंदाच्या शेतकरी आंदोलनातील हा पहिलाच मृत्यू मानला जात आहे.
शेतकरी जखमी झाले होते
गुरुदासपूरच्या चाचौकी गावचे सरपंच जगदीश सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला, अश्रुधुरांच्या नळकांळ्या लागल्याने जखमी झालेल्या ज्ञानसिंग यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ज्ञानसिंग 11 फेब्रुवारी रोजी किसान मजदूर संघर्ष समितीच्या गटासह शंभू सीमेवर गेले होते. 14 फेब्रुवारी रोजी अश्रूधुरांच्या नळकांड्याने ते गंभीर जखमी झाले होते.