घर मालकाला वीज बिल पाहून बसला 440 व्होल्टचा झटका, हजार, लाख नाही तर इतक्या कोटींचे बिल
त्या घरमालकाला दरमहा सरासरी 1000 रुपये वीज बिल येत होते. परंतु, जुलै महिन्यात त्याला तब्बल काही कोटी इतके वीज बिल आले. हे बिल पाहून त्याने तत्काळ वीज विभागाकडे धाव घेतली. मात्र, घरमालकाला इतके बिल आले कसे याचीच सर्वत्र चर्चा होत आहे.
वीज विभागाने नोएडा येथील सेक्टर-122 मध्ये राहणाऱ्या एका घरमालकाला जुलै महिन्याचे वीज बिल पाहून 440 व्होल्टचा झटका बसला. एवढे मोठे बिल पाहून त्याने या प्रकरणाची तक्रार वीज विभागाकडे केली. मात्र, याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. एका घराचे बिल कोट्यवधी रुपये कसे येऊ शकते हा प्रश्न सर्वाना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसंत शर्मा हे रेल्वेत काम करतात. नोएडामध्ये सेक्टर 122 च्या सी ब्लॉकमध्ये ते रहातात. जुलै महिन्यात बसंत याच्या मोबाईलवर वीजबिलाचा संदेश आला. मात्र, हा संदेशातील वीज बिलाची रक्कम पाहून बसंत शर्मा हादरले. कारण, वीज विभागाने पाठवलेल्या संदेशात बसंत शर्मा यांना तब्बल 4 कोटी 2 लाख रुपयांचे बिल पाठवण्यात आले होते.
नोएडामध्ये एका सर्वसामान्य ग्राहकाला तब्बल चार कोटी रुपयांचे बिल देण्यात आल्याने वीज विभागाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. ज्यावेळी वीज बिल आले त्यावेळी बसंत हा प्रशिक्षणासाठी शिमला येथे गेला होता. तेथून परत आल्यानंतर त्याने तात्काळ वीज वितरण अधिकाऱ्यांना ही माहिती दिली आणि वीज विभागाकडे तक्रार नोंदविली. वीज विभागाने बसंत यांना वीजबिल भरण्यासाठी 24 जुलैपर्यंत मुदत दिली होती.
घरमालक बसंत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, वीज कंपनीकडून एक एसएमएस अलर्ट मिळाला. ज्यामध्ये त्याला कळवले होते की 9 एप्रिल ते 18 जुलै या तीन महिन्यांचे वीज बिल रुपये 4 कोटी 02 लाख 31 हजार 842.31 रुपये इतके असल्याचे कळविण्यात आले. तसेच ही रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख 24 जुलै देण्यात आली आहे.
विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना बसंत शर्मा यांची तक्रार प्राप्त झाल्यांनतर त्यांनी वीज बिल 28 हजार रुपये इतके कमी केले. नोएडा येथील इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशनचे मुख्य अभियंता हरीश बन्सल यांनी सांगितले की, एक प्रकरण आमच्या निदर्शनास आले होते. ग्राहकांचे बिल थांबवण्यात आले होते. परंतु, त्यानंतरही त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचला, ही तांत्रिक चूक आहे. आता जे बिल त्यांना देण्यात आले आहे ते दुरुस्ती करून देण्यात आले आहे. सध्या ग्राहकाला नवीन बिल ग्राहकाला पाठवले आहे.