सीमेवरील वाढत्या तणावाने हिंदुस्थानने घेतला महत्वाचा निर्णय, लेह सीमेवर आणखी एक….
लडाखच्या गलवान खोऱ्यात 2020 च्या जून महिन्यात भारतीय आणि चीनी सैन्यात 1962 च्या युद्धानंतर प्रथमच चकमक झडली होती. या झटापटीत बंदुकीची एकही गोळी न सुटता दोन्ही बाजूंच्या सैनिकांचा मृत्यू झाला होता.
भारताने सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. जम्मू आणि कश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविल्यानंतर जम्मू आणि कश्मीर आणि लडाखला देखील दोन केंद्र शासित प्रदेश केले आहेत. आता लडाखला लागून असलेल्या सीमेवर चीनच्या वाढत्या कुरापती पाहून आता भारताने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सीमा भागात भारतीय सैन्य आणि चीनी सैन्यात वारंवार होणाऱ्या धुमश्चक्रीपाहून आता भारतीय वायू सेना सावधान झाली आहे. भारतीय वायू दलाने आता लेह भागात आपला दुसरा एअरबेस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
लडाख भागातील गलवान खोऱ्यात 2020 च्या जून महिन्यात भारतीय सैन्य आणि चीन सैन्यात साल 1962 च्या युद्धानंतर प्रथमच चकमक झडली होती. या झटापटीत बंदुकीची एकही गोळी न सुटता 20 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता. चीनच्या सैनिकांचाही या धुमश्चक्रीत मोठी जिवितहानी झाली होती. परंतू नेहमी प्रमाणे चीनने ती जगापासून दडवून ठेवली होती. जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आणि लष्करी ताकत असलेली दोन राष्ट्रांची ही सीमा सर्वात उंचीवरील आणि अत्यंत प्रतिकूल हवामान असलेली धोकादायक सीमारेषा म्हणून ओळखली जाते. भारत आणि चीनची सीमा रेषा 3,440 किमी पेक्षा लांबीची आहे. या सीमारेषेबाबत दोन्ही देशांचे वाद आहेत. या सीमारेषेवर लेह भागात भारताने चीनच्या कोणत्याही आगळीकीला सज्ज राहण्यासाठी आणखी एक एअर बेस तयार करण्यास आधीच सुरुवात केली आहे.
लेहच्या हवाई तळावर काही वर्षांपासून मिलीटरी आणि सिव्हीलियन फ्लाईट्सचे प्रमाण वाढले आहे. परंतू सध्याच्या हवाईपट्टीला अति उंचीमुळे आणि प्रतिकुल हवामानामुळे सकाळच्या वेळेत वापरण्यात अडचणी येत आहेत. आता लेह येथील हवाई तळावर पूर्वी पेक्षा अधिक विमानाचे उड्डाण आणि लॅंडीग होत आहे. सध्या भारतीय वायू दलाची रफाल, मिग-29, सुखोई – 30 विमाने आणि अपाचे हेलिकॉप्टर आलटून पालटून येथे सरावासाठी येत असतात.
गेल्यावर्षी c- 17 एअरक्राफ्टमुळे दोन दिवस हवाई धावपट्टी ब्लॉक झाल्याची घटना घडली होती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अशा कसोटीच्या क्षणी हवाईपट्टी ब्लॉक होणे धोक्याचे असल्याने या विमानतळाच्या हवाई पट्टीचा विस्तार करण्याचा निर्णय हवाई दलाने घेतला. या नव्या धावपट्टीमुळे सियाचीन भागात गस्त घालण्यासाठी आयत्यावेळी मोहीमा राबिविण्यासाठी येथे अतिरिक्त विमाने उतरविता येतील. तसेच हिवाळ्यात जेव्हा ग्राऊंड एक्सेस लिमिटेड होईल त्यावेळी ही धावपट्टी सियाचीनसाठी एक ब्रिज म्हणून काम करेल.
अति उंचावरील ऑपरेशनची स्ट्रॅटेजी
दुहेरी रनवे असलेला लेह हा भारतीय वायू दलाचा पहिला अति उंचीवर विमानतळ आहे. तिबेट येथे चीनकडून अनेक ऑपरेशनल रनवे बांधलेले असून ते सक्रीय आहेत. होटन, शिग्स्टे आणि चांगडू बांगडा सारखे विमानतळ चीनने तयार केले आहे. जम्मू आणि कश्मीरमधील अतिरेक्यांचे कारवाया, लाईन ऑफ कंट्रोल ( एलओसी ) आणि एलएसीवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन एअर फोर्सने पेट्रोलिंगचा निर्णय घेतला आहे.