मुंबई – एकनाथ शिंदे (Eknath Shinde)गटाकडे ५० हून जास्त आमदार असतानाही महाविकास आघाडी सरकार (MVA government) टिकेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांना आहे. काल रात्री दोन अपक्ष आमदारही शिवेसनेच्या गोटात सामील झाले असले तरी, आकडा चंचल असतो असे संजय राऊत यांचे म्हणणे आहे. शिंदे गटाकडे ४० आमदार आहेत, असे कुणी सांगतय, तर कुणी १४० आमदार आहेत, असे सांगत आहेत, मात्र हा आकडा चंचल असतो. खरी लढाई ही सभागृहात होईल आणि त्यात महाविकास आघाडीचाच विजय होईल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
कालपर्यंत या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी परतावं, त्यांच्या मनात जो विचार आहे, काँग्रेस-राष्ट्रावादीसोबत कडीमोड घेण्याचा, त्या विचारावर चर्चा करु, मात्र २४ तासांत मुंबईत परत या, असं आवाहन करणारे संजय राऊत यांनी आता ही लढाई कायदेशीर असल्याचे जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतर आणि संजय राऊत यांनीही तुमच्या मनासारखं करण्याच्या दिलेल्या आश्वासनानंतरही शिंदे गट त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिलेला दिसतो आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षातील फूट अटळ मानण्यात येते आहे. संजय राऊत यांनीही ही आता कायदेशीर लढाई आहे, असे सांगत, त्यावर एकाअर्थी शिक्कामोर्तबच केले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईत आल्यानंतर त्यांच्या निष्ठेची, बाळासाहेबांवरील भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची कसोटी लागणार असल्याचे राऊत म्हणाले आहेत.
गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर, शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही हाच विश्वास व्यक्त केला होता. बहुमत हे विधानभवनात सिद्ध होते, त्यामुशे सदनात मविआचे बहुमत सिद्ध होईल, असे त्यांनी सांगितले होते. शवसेनेच्या आमदारांनी केलेले बंड हे बेकायदेशीर असून, त्यांच्यावर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले होते. छगन भुजबळांच्या बंडाची आठवण करुन देत, या फुटलेल्या आमदारांपैकी अनेकांना पुढची निवडणूक जिंकून येणे अवघड असेल असेही पवार म्हणाले होते.
शरद पवारांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर काही वेळातच एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर १२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
1. एकनाथ शिंदे
2. अब्दुल सत्तार
3. संदीपान भुमरे
4. प्रकाश सुर्वे
5. तानाजी सावंत
6. महेश शिंदे
7. अनिल बाबर
8. यामिनी जाधव
9. संजय शिरसाट
10. भरत गोगावले
11. बालाजी किणीकर
12. लता सोनावणे