मतदानाचा टक्का घसरला; कोणाच्या दाव्यात किती दम? जाणून घ्या पहिल्या टप्प्यातील घडामोड
Lok Sabha Election 2024 Voting : देशात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मतदान त्रिपुरामध्ये झाले. या छोट्या राज्यात 80.17 टक्के मतदान झाले. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 77.57 टक्के, मेघालयात 74.21 टक्के, पुडुचेरीत 73.50 टक्के तर आसाममध्ये 72.10 टक्के मतदान झाले.
लोकसभा निवडणूक 2024 च्या रणधुमाळीत पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी झाले. 21 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान झाले. सर्व जागांवर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 62.37 टक्के इतके मतदान झाले होते. आता मतपेट्या 4 जून रोजी उघडतील. सर्वाधिक मतदान त्रिपुरामध्ये 80.17 टक्के इतके झाले. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 77.57 टक्के, मेघालयात 74.21 टक्के, पुडुचेरीत 73.50 टक्के तर आसाममध्ये 72.10 टक्के मतदान झाले. अरुणाचल प्रदेशासह सिक्किम राज्यात विधानसभेसाठी मतदान झाले. निवडणूक आयोगानुसार, सर्व मतदान केंद्रावरील आकडेवारी हाती आल्यानंतर मतदानाचा टक्का वाढू शकतो. पश्चिम बंगाल, मणिपूर येथील काही भागात हिंसेच्या घटना घडल्या. पहिल्या टप्प्यातील मतदानाचा टक्का घसरल्याने चिंता व्यक्त होत आहे.
कुणाच्या पारड्यात मत
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रतिक्रिया मिळत असल्याचे म्हटले आहे. भारतात विक्रमी संख्येने एनडीएला मतदान झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी मतदारांचे आभार सुद्धा मानले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पहिल्याच दिवशी भाजपचा फुगा फुटल्याचा दावा त्यांनी केला. भाजपाची कामगिरी लोकांना आवडली नसल्याचे ते म्हणाले. इंडिया आघाडीतील उमेदवारांना मतदान केल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.
- मणिपूर-राजस्थानमध्ये किरकोळ हिसेंच्या घटना घडल्या. मणिपूर येथील थमनपोकपी मतदान केंद्रावर गोळीबाराची घटना घडली. तर इरोइसेम्बामध्ये पण हिंसा झाली. मणिपूरमध्ये 68.62 टक्के तर बंगालमध्ये 77.57 टक्के मतदान झाले. राजस्थानमधील नागोर येथे आरएलपी आणि भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार द्वीप समूहासह, आसाममध्ये काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम गडबडीचे आरोप झालेत.
- पश्चिम बंगाल, छत्तीसगडमध्ये पण हिसेंच्या घटना घडल्या. पश्चिम बंगालमधील कुचबिहार केंद्रावर टीएमसी आणि भाजप कार्यकर्ते भिडले. तर छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 63.41 टक्के मतदान झाले. ग्रेनेड फुटल्याने सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. तर एक अधिकारी आयईडी स्फोटात जखमी झाला. बस्तरमधील 56 गावातील नागरिकांनी पहिल्यांदा मतदान केले.
- ईव्हीएममध्ये तांत्रिक दोष आल्याने आसाम, अंदमान-निकोबार आणि तामिळनाडूमध्ये मतदान प्रक्रियेत अडथळा आला. आसाममध्ये होजई, कालियाबोर आणि बोकाखटमध्ये, नाहरकटियामध्ये मतदान यंत्र नादुरुस्तीची तक्रार आल्यानंतर ते दुरुस्त करण्यात आले आणि पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. अंदमान-निकोबारमध्ये अशीच घटना घडली. यंत्रात दुरुस्ती करण्यात आली, मतदान सुरळीत पार पडले.
हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update