रेल्वेच्या प्रत्येक डब्यावर असतो “हा” खास कोड! जाणून घ्या त्या पाच आकड्यांचा अर्थ
ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेक वेळा आपण डब्यांवर लिहिलेले ५ आकडे पाहतो, पण बहुतेक लोकांना वाटतं की हे फक्त नावापुरते लिहिलेले असतात. खरंतर, या आकड्यांमागे एक खास माहिती असते, जी प्रत्येकाला माहिती असेलच असं नाही.

भारतीय रेल्वेचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर लांबच लांब रुळ, धावणाऱ्या गाड्या आणि गर्दीने भरलेले स्टेशन उभं राहतं. ही फक्त एक वाहतूक सेवा नसून, दररोज कोट्यवधी लोकांच्या प्रवासाचा आधार आहे. दररोज जवळपास १३,००० हून अधिक रेल्वेगाड्या धावत असलेल्या भारतीय रेल्वेला प्रवाशांच्या संख्येनुसार जगात पहिलं स्थान मिळालं आहे. तर लांबीच्या दृष्टीने ती चौथ्या क्रमांकावर आहे.
आपण प्रवास करताना अनेकदा रेल्वेच्या डब्यावर लिहिलेले पाच आकडे पाहिले असतील. पण फार कमी लोकांना माहित असतं की या आकड्यांचा अर्थ काय आहे. हे केवळ क्रमांक नसून त्या डब्याविषयी महत्त्वाची माहिती देणारे संकेत असतात. रेल्वे कर्मचारी, स्टेशन मास्टर किंवा देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा उपयोग डब्याचा प्रकार, निर्माण वर्ष आणि त्याच्या स्थितीबाबत समजून घेण्यासाठी होतो.
या पाच आकड्यांपैकी पहिले दोन आकडे त्या डब्याचं निर्माण वर्ष सांगतात. उदा. जर डब्यावर ’08’ असं लिहिलेलं असेल, तर त्याचा अर्थ असा की तो डबा 2008 साली तयार करण्यात आला आहे. या माहितीमुळे रेल्वे प्रशासनाला डब्याच्या मेंटेनन्स किंवा बदलासाठी लागणारा अंदाज लावता येतो. उर्वरित तीन आकडे त्या डब्याचा प्रकार स्पष्ट करतात. हे आकडे 001 पासून 400 च्या दरम्यान असतात आणि यावरून फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, AC टियर इत्यादी प्रकार समजतात.
उदाहरणार्थ, जर आकडे 001 ते 025 दरम्यान असतील, तर तो डबा फर्स्ट क्लास श्रेणीचा असतो. 026 ते 050 म्हणजे फर्स्ट AC किंवा सेकंड AC. 051 ते 100 दरम्यानचे आकडे AC 2 टियर, 101 ते 150 हे AC 3 टियर, 151 ते 200 हे AC चेअर कार, तर 201 ते 400 हे सेकंड क्लास स्लीपरचे निदर्शक असतात. या माहितीचा उपयोग केवळ प्रवाशांना नाही, तर तांत्रिक कामगारांनाही संबंधित डब्याची स्थिती आणि सुविधा तपासण्यासाठी होतो. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि डब्याच्या बाहेर काही आकडे दिसले, तर त्यांचा अर्थ लक्षात घ्या.