Dharampal Gulati | महाशय धर्मपाल गुलाटींच्या ‘MDH’ कंपनीच्या नावामागील कहाणी माहित आहे?
धर्मपाल यांच्या वडिलांनी 'महाशियान दी हट्टी'ची स्थापना केली होती. त्यावरुनच कंपनीचं पुढे 'एमडीएच' असं नामकरण झालं.
नवी दिल्ली : ‘मसाल्यांचा शहेनशाह’ म्हणून सुपरिचित असलेले ‘एमडीएच‘ (MDH) कंपनीचे सर्वेसर्वा महाशय धर्मपाल गुलाटी (Mahashay Dharampal Gulati) यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. वयाच्या 97 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे गुलाटी यांची प्राणज्योत मालवली. महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जीवनप्रवास फक्त उद्योजकच नाही, तर सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. (The Story behind MDH Name and Masala King Mahashay Dharampal Gulati)
‘असली मसाले सच सच… एमडीएच… एमडीएच’ अशी जिंगल लागल्यानंतर पडद्यावर येणाऱ्या वृद्धाचा हसतमुख चेहरा आपल्यासाठी नवीन नाही. महाशय धर्मपाल गुलाटी ‘मसालेवाले दादाजी’ म्हणूनही ओळखले जात. धर्मपाल यांचे वडील महाशय चुन्नीलाल गुलाटी यांनी ‘महाशियान दी हट्टी’ची स्थापना केली होती. त्यावरुनच महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या कंपनीचं पुढे ‘एमडीएच’ असं नामकरण झालं.
पाचवीत शाळेला रामराम
धर्मपाल गुलाटी यांचा जन्म 27 मार्च 1923 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या सिआलकोटमध्ये झाला. धर्मपाल पाचवीत असतानाची गोष्ट… गुरुजींनी दिलेल्या ओरड्यामुळे रागाच्या भरात या साहेबांनी शाळेला रामराम ठोकला. पोराचं पुढे कसं व्हायचं, हा प्रश्न धर्मपाल यांचे वडील महाशय चुन्नीलाल गुलाटी यांना पडला. पाचवीपर्यंत शिकलेला पोरगा मसाल्यांच्या व्यापारात मोठं नाव कमवेल, हे वडिलांच्या ध्यानीमनीही नसेल.
पंजाबीत दुकानाला हट्टी म्हणतात. यावरुनच चुन्नीलाल यांनी दुकानाचं नाव ‘महाशियान दी हट्टी’ असं ठेवलं. 1919 पासून सियालकोटमध्ये चुन्नीलाल गुलाटींचा व्यवसाय सुरु होता. वडिलांच्या सांगण्यानुसार धर्मपालही गावोगाव मसाले विकत फिरायला लागले. आश्चर्य म्हणजे त्या काळी दिवसाला पाचशे रुपयांची कमाई ते करत असल्याचं बोललं जातं.
टांगा व्यवसायातही नशीब आजमावलं
1947 मध्ये फाळणीनंतर गुलाटी कुटुंब भारतात आलं. धर्मपाल यांच्या हातामध्ये दीड हजार रुपयांची रोकड होती. कोणता व्यवसाय करावा, या विचारातून ते चांदनी चौकात गेले आणि तिथे चक्क 650 रुपयांना त्यांनी टांगा खरेदी केला. पण या टांगेवाल्याकडे फारशी गिऱ्हाईक फिरकेना आणि महाशयांचं मनही त्यात रमेना. अखेर त्यांनी आपला टांगा भावाला चालवायला दिला.
आपला पूर्वापार मसाल्यांचा व्यापार दिल्लीत सुरु करावा, हा विचार त्यांनी मनाशी पक्का केला. मसाल्याचं मार्केट असलेल्या खारी बावलीमध्ये त्यांनी दुकान थाटलं. धर्मपाल यांच्या हाताला यश होतं. मसाल्यांचा व्यवसाय बहरु लागला. दिल्लीत त्यांच्या दुकानांची संख्या वाढत गेली. आणि अखेर ‘एमडीएच’ या नावाने कंपनी सुरु झाली. (The Story behind MDH Name and Masala King Mahashay Dharampal Gulati)
धर्मपाल गुलाटी हे एफएमसीजी सेक्टरमध्ये सर्वाधिक मानधन घेणारे सीईओ ठरले होते. 2018 मध्ये त्यांना 25 कोटी रुपये इन हँड सॅलरी मिळत असल्याचं बोललं जातं. विशेष म्हणजे गुलाटी आपल्या पगारातील 90 टक्के रक्कम दान करत. ते 20 शाळा आणि 1 हॉस्पिटल चालवतात. गरजूंना वेळोवेळी मदत करण्यासाठी ते ओळखले जातात. 2019 मध्ये त्यांना पद्मभूषण या तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
धर्मपाल यांच्या आत्मचरित्राच्या नावातच ‘टांगेवाला कैसे बना मसालों का शहेनशाह?’ असं होतं. मसाल्यांच्या या अनभिषिक्त सम्राटाला पुढील पिढ्या स्मरणात ठेवतील, यात शंकाच नाही.
संबंधित बातम्या :
एमडीएचचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन
(The Story behind MDH Name and Masala King Mahashay Dharampal Gulati)