Home Loan : घर घेताय, खुशखबर, होमलोनवर मिळणार सब्सिडी, फायदा 25 लाख लोकांना होणार
Home Loan : देशाच्या शहरी भागातील नागरिकांसाठी खास योजना तयार होत आहे. या योजनेत जवळपास 25 लाख लोकांना हक्काचा निवारा मिळणार आहे. गृहकर्ज तर मिळेलच. पण त्यावर सबसिडी पण मिळेल, अशी ही योजना आहे. या योजनेमुळे देशातील नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होईल. काय आहे ही योजना, कोणाला होईल फायदा
नवी दिल्ली | 26 सप्टेंबर 2023 : शहरातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांसाठी केंद्र सरकार (Central Government) एक खास योजना तयार करत आहे. त्यामाध्यमातून त्यांना त्यांच्याा हक्काचे घर खरेदी करता येईल. त्यांना घराचे स्वप्न साकार करता येईल. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना पॉलिटिकल गेन असल्याचा आरोप होत आहे. पण ही योजना सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर देण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. या योजनेत नागरिकांना गृहकर्ज (Home Loan Subsidy) घ्यावे लागेल. पण या गृहकर्जावर त्यांना सबसिडी मिळेल. त्यामुळे कर्जाचा बोजा पडणार नाही. त्यांचे घराचे स्वप्न साकार होईल. कोणती आहे ही योजना, काय होईल फायदा…
पंतप्रधान आवास योजना
पंतप्रधान गृहनिर्माण योजना गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गासाठी आहे. 22 जून 2015 रोजी ही योजना सुरु झाली. आतापर्यंत 1.18 कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या योजनेचा पुढचा टप्पा 2028 पर्यंत वाढविण्यात आला आहे. या योजनेत केंद्र सरकारकडून आता थेट लाभार्थ्याच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत आहे. पुढील प्रक्रियेसाठी ही योजना लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी येईल.
कसा होईल फायदा
या निवडणुकीपूर्वीच केंद्र सरकार धमाका करण्याच्या विचारात आहे. पीएम आवास योजनेसाठी 60 हजार कोटींचे अनुदान देण्याची योजना आहे. या योजनेतंर्गत 9 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येईल. कर्जाच्या व्याजावर सबसिडी देण्यात येईल. त्यामुळे कर्ज वार्षीक 3 ते 6.5 टक्के दराने मिळेल. 20 वर्षे मुदतीसाठी 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.
कोणाला होईल लाभ
ही योजना या महिन्याच्या अखेरपर्यंत मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय गृह आणि नगरविकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी याविषयीची माहिती दिली. भाड्याच्या घरात राहणारे, झोडपट्टी, चाळीत, अनाधिकृत वसाहतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांचे घराचे स्वप्न या योजनेमुळे आकाराला येईल.
स्वप्न येईल सत्यात
गेल्या एक वर्षापासून केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केलेली आहे. त्याचा थेट परिणाम गृहकर्जावर दिसून येत आहे. एकतर कर्जदारांचा हप्ता वाढला आहे. तर काहींच्या हप्त्याचा कालावधी कित्येक महिन्यांनी पुढे सरकला आहे. बँका व्याजावर व्याज वसूल करत आहे. अशावेळी भाड्याच्या घरात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे घराचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होईल.