Ram Mandir : अयोध्येतील रामललाची तिसरी मूर्ती आली समोर, कुठे करणार स्थापित? जाणून घ्या
अयोध्या नगरी प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर उत्साहाने न्हाहून आहे. दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली. अनेकांनी इतकी वर्षे घेतले प्रण सोडले. तर काही जण हा क्षण पाहून भावुक झाले. असं सर्व भक्तिमय वातावरण असताना प्रभू रामचंद्रांची तिसरी मूर्ती समोर आली आहे.
मुंबई : अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तीन मूर्ती घडवल्या गेल्या होत्या. त्यापैकी सध्या मंदिरात स्थापित झालेल्या मूर्तीची स्थापना झाली आहे. त्यामुळे उर्वरित दोन मूर्तींबाबतही उत्सुकता होती. शिल्पकारांनी त्या मूर्तींना कसा आकार दिला असेल. त्यावर कसा भाव प्रकट झाला असेल याची उत्सुकता होती. अखेर हा फोटो समोर आला आहे. प्रभू रामांच्या तिन्ही मूर्ती बालस्वरुपातील होत्या. सध्या गाभाऱ्यात विराजमान असलेली मूर्ती अरुण योगीराज यांनी घडवली आहे. तर श्वेत रंगाची मूर्ती शिल्पकार सत्य नारायण पांडे यांनी, तर तिसरी मूर्ती बंगळुरुचे शिल्पकार जी एस भट यांनी साकारली होती. त्यामुळे तिन्ही मूर्तींचं देखणं रुप समोर आलं आहे. माहितीनुसार या तिन्ही मूर्ती मंदिर परिसरातच स्थापित केल्या जाणार आहेत. पण नेमकं कुठे याबाबत काही सांगण्यात आलेलं नाही. याचा निर्णय श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट घेणार आहे.
माहितीनुसार श्वेत रंगातील मूर्ती मंदिराच्या पहिल्या मजल्यावर स्थापित केली जाण्याची शक्यता आहे. तर तिसरी मूर्ती स्थापित करण्याबाबत अजून काही ठरलेलं नाही. प्रभू रामचंद्रांची तिसरी मूर्तीही काळ्या पाषाणात कोरली आहे. या मूर्तीच्या उजव्या हातात बाण आणि डाव्या हातात धनुष्य आहे. मंदिरात स्थापन केलेल्या मूर्तीत धनुष्य-बाण नव्हते. त्यात सोन्याने तयार केलेले बसवण्यात आले आहेत. पण तिसऱ्या मूर्तीत ते पाषाणातच कोरण्यात आले आहेत.
श्वेत रंगातील मूर्ती शिल्पकार सत्य नाराणय पांडे यांनी घडवली आहे. या मूर्तीच्या चरणाजवळ परमभक्त हनुमान आहे. तसेच भगवान परशुराम आणि गौतम बुद्ध दिसत आहेत. तसेच या मूर्तीला सोन्याच्या आभुषणांनी मढवण्यात आलेलं दिसत आहे. दुसरीकडे, मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे. गाभाऱ्याचं काम झालं असलं तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचं काम सुरु होणार आहे. तसेच मंदिराचं कळस तयार झालेला नाही. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या मते, मंदिर परिसरात गणपती, माता शबरीसहीत अन्य मंदिर तयार करणं बाकी आहे.