जगातील पहिला ‘कौन बनेगा ट्रिलियनेअर’? या भारतीय उद्योगपतीचे नाव आहे चर्चेत
फोर्ब्सच्या यादिनुसार 2023 मध्ये जगभरात एकूण 2,640 अब्जाधीश होते. तर, जग आता पहिल्या ट्रिलियनेअरसाठी तयार झाले आहे. अमेरिकन अब्जाधीश मार्क क्यूबन यांनी 2017 मध्ये असे भाकीत वर्तविले होते की, जगातील पहिला ट्रिलियनेअर AI सोबत काम करणारा उद्योजक असेल. ही भविष्यवाणी आता खरी होताना दिसत आहे.
नवी दिल्ली | 1 फेब्रुवारी 2024 : एक ट्रिलियन डॉलर्स, हजार अब्ज डॉलर्स किंवा एक ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती हे आश्चर्यकारक वाटत नाही का? एक ट्रिलियन डॉलर्स हा इतका पैसा आहे जो जगभरातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. तेलाने भरलेल्या विहिरी, मॅकडोनाल्ड्स, पेप्सिको, कोका-कोला यासारख्या कित्येक नामांकित कंपन्यांचे शेअर्स, आयपीएलच्या टीम, जगातील अव्वल सहा फुटबॉल संघ आणि इतके खरेदी करूनही हे पैसे संपणार नाहीत. ट्रिलियनेअर कधी पाहू शकतो का? याचे भाकीत करणे खूप कठीण असले तरी लवकरच जगातला पहिला ट्रिलियनेअर बनण्याच्या रेसमध्ये जगातील पाच उद्योजक पुढे आहेत.
1916 मध्ये अमेरिकन उद्योगपती जॉन डी. रॉकफेलर हे जगातील पहिले अब्जाधीश बनले होते. त्यानंतर तब्बल 83 वर्षांनंतर बिल गेट्स जगातली अशी पहिली व्यक्ती बनली की ज्यांच्या संपत्तीने शंभर अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला. परंतु, अब्जाधीश होणे ही तशी काही मोठी गोष्ट राहिली नाही.
फोर्ब्सच्या यादिनुसार 2023 मध्ये जगभरात एकूण 2,640 अब्जाधीश होते. तर, जग आता पहिल्या ट्रिलियनेअरसाठी तयार झाले आहे. अमेरिकन अब्जाधीश मार्क क्यूबन यांनी 2017 मध्ये असे भाकीत वर्तविले होते की, जगातील पहिला ट्रिलियनेअर AI सोबत काम करणारा उद्योजक असेल. ही भविष्यवाणी आता खरी होताना दिसत आहे.
ऑक्सफॅमच्या अहवालानुसार 2020 पासून जगातील सर्वात श्रीमंत अशा पाच व्यक्तींच्या संपत्तीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. यात टेस्लाचे सीईओ एलोन मस्क, एलव्हीएमएचचे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन आणि गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचा समावेश आहे.
ज्या व्यक्तींच्या संपत्तीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे त्यामध्ये एलोन मस्क यांनी मोठी झेप घेतली आहे. त्यांची संपत्ती वार्षिक सरासरी 162 टक्क्यांनी वाढत आहे. नशिबाने त्यांना साथ दिली आणि याच वेगाने ही संपत्ती वेगाने वाढत राहिली तर 2032 मध्ये ते जगातील पहिले ट्रिलियनियर होतील असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. त्यापाठोपाठ अर्नॉल्ट, बेझोस, एलिसन आणि बफे यांचा नंबर लागेल. परंतु, ट्रिलियनियर होण्याच्या या शर्यतीत बेझोस आघाडीवर आहेत. 2020 च्या अभ्यासानुसार बेझोस हे 2026 पर्यंत ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती निर्माण करू शकतात असा अंदाज आहे.
2022 मध्ये आणखी एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती गाठणाऱ्या २१ लोकांमध्ये मस्क हे पहिले होते. त्याचप्रमणे भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि चिनी उद्योजक झांग यिमिंग हे देखील या स्पर्धेत आहेत. पण, बहुधा इतिहासातील पहिला ट्रिलियनियर व्यक्ती ही अमेरिकनच असेल जी आधीपासूनच जगातील सर्वात श्रीमंत अशा व्यक्तींपैकी एक आहे. त्याचे नाव अर्थातच एलोन मस्क हेच आहे.