या नेत्याचा संपूर्ण पक्ष काँग्रेसमध्ये विलीन, माजी खासदारांसह अनेक नेत्यांनी घेतले सदस्यत्व
राहुल गांधी हे या जगातील सर्वात संघर्षशील व्यक्ती आहेत. मी त्यांचा खूप आदर करतो. भारताची मने कोणी जिंकली असतील तर ते राहुल गांधी आहेत. या लढ्यात मला नेहमीच सहभागी व्हायचे होते. त्यासाठी हा निर्णय घेत आहे.
बिहार | 20 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बिहारमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सत्ताधारी NDA चा थेट सामना ‘महाआघाडी’शी होत आहे. भाजप नेतृत्वाखालील NDA मध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार, जितन राम मांझी, चिराग पासवान यांचे पक्ष सामील झाले आहेत. तर, कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली लालुप्रसाद यादव, तेजस्वी यादव ही नेते मंडळी एकत्र आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले पशुपती पारस हे ही कॉंग्रेसच्या गोटात सामील होण्याची शक्यता आहे. अशातच बिहारमधील एका नेत्याने आपला संपूर्ण पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करून इंडिया आघाडीला बळ दिले आहे.
बिहारमधील जन अधिकार पक्ष (JAP) या प्रादेशिक पक्षाचे नेते पप्पू यादव यांनी आपला संपूर्ण पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केलाय. तेजस्वी यादव यांच्यासोबत मिळून आपण, भाजपविरोधात आवाज उठवणार आहे असे त्यांनी जाहीर केलं आहे. पप्पू यादव यांनी आरजेडी प्रमुख लालू यादव आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
जन अधिकार पक्षांचे अध्यक्ष पप्पू यादव यांनी मधेपुरा येथून 2014 मध्ये आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. त्यामुळे त्यांनी आरजेडी प्रमुख लालू यादव आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली. यानंतर पप्पू यादव यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व घेतले. तत्पूर्वी, पत्रकारांशी संवाद साधताना पप्पू यादव यांनी, ‘तेजस्वी यादव यांच्यासोबत भाजपविरोधात आवाज उठविणार आहोत असे म्हटले.
काँग्रेस विचारसरणीचा आपल्यावर नेहमीच प्रभाव राहिला आहे. आपल्या पक्षाला संघर्षाचा इतिहास आहे. राहुल गांधी हे या जगातील सर्वात संघर्षशील व्यक्ती आहेत. कॉंग्रेसच्या प्रियांका गांधी हे माझे आवडते व्यक्तीमत्व आहे. मी त्यांचा खूप आदर करतो. भारताची मने कोणी जिंकली असतील तर ते राहुल गांधी आहेत. या लढ्यात मला नेहमीच सहभागी व्हायचे होते. त्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे पप्पू यादव यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्याशिवाय देशाला दुसरा मार्ग नाही. त्यामुळे आम्ही आमचा संपूर्ण पक्ष आणि आमचा मुलगा सार्थक रंजन यांच्यासह काँग्रेससोबत आहोत. आम्ही फक्त 2024 जिंकणार नाही तर 2025 देखील जिंकू. बिहारमध्ये काँग्रेसला मजबूत पक्ष बनवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी माझ्या पक्षाची संपूर्ण यादी पवनखेडा यांच्याकडे सोपवत आहे आणि ती काँग्रेसमध्ये विलीन करणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.