‘बूट घालण्याचा विचारही कधी मनात आला नाही’, …अन् पंतप्रधान मोदींनी सांगितला वडिलांचा तो किस्सा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तब्बल तीन तासांचा पॉडकास्ट प्रसारित करण्यात आला आहे. प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तब्बल तीन तासांचा पॉडकास्ट प्रसारित करण्यात आला आहे. प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे. 1.4 अब्ज भारतीय लोक हेच माझी ताकद असल्याचं या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या तीन तासांमध्ये मोदी यांनी आपल्या आयुष्यातील विविध किस्से सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी वडनगरच्या ऐतिहासिक समृद्धीचा आणि त्यांनी त्यांच्या लहानपणी अनुभवलेल्या गरीबीचा तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या कठोर परिश्रमांचा उल्लेख केला.
या पॉडकास्टमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना देखील सल्ला दिला आहे. तरुणांनी संयम बाळगला पाहिजे, कठोर परिश्रम करा आणि आयुष्यात काहीतर करा असा सल्ला मोदी यांनी आजच्या तरुणाईला दिला आहे. माझी ताकद माझ्या नावात नसून, 1.4 अब्ज भारतीयांमध्ये तसेच भारतीय संस्कृती आणि येथील परंपरांमध्ये असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वडिलांच्या बुटांचा देखील एक किस्सा सांगितला आहे.
या पॉडकास्टमध्ये आपल्या वडिलांबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वडिलांच्या बुटांचा एक किस्सा सांगितला. माझे वडील हे चामड्यापासून बनवलेले पारंपारिक बूट वापरत असत, हे बूट गावातच हाताने तयार केले जायचे. हे बूट खूपच मजबूत आणि टिकाऊ होते. जेव्हा माझे वडील चालायला सुरुवात करत तेव्हा त्या बुटांचा टक, टक, टक असा आवाज येत असे. माझ्या वडिलांच्या केवळ बुटांचा आवाज ऐकून तेथील लोकांना वेळेचा अंदाज लावता येत होता. ते म्हणायचे अरे दामोदरदास आले, अशी त्यांची शिस्त होती. ते रात्री उशिरापर्यंत काम करायचे. आम्हाला गरिबीची झळ बसू नये असा आमच्या आईचा प्रयत्न असायचा, मात्र ती जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीचा आमच्या मनावर कोणताही परिणाम झाला नाही. मला अजूनही आठवत की शाळेत जाताना बूट घालण्याचा विचारही कधी माझ्या मनात आला नाही.