भरधाव ट्रकने आधी स्कूटीला धडक दिली, मग 500 मीटरपर्यंत फरफटत नेले; काळजाचा थरकाप उडवणारी घटना कुठे घडली?
भरधाव ट्रकने स्कूटीला धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. अपघात इतका भयानक होता की पहाणाऱ्याच्या काळजाचा थरकाप उडेल. धडक दिल्यानंतर पुढे जे झाले ते भयंकरच.
शाहजहापूर : उत्तर प्रदेशातील शाहजहापूर परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. भरधाव वेगातील ट्रकने एका स्कुटीला जोरदार धडक दिली. ट्रकच्या धडकेने तिघांचा मृत्यू झाला असून त्यात एका तीन वर्षांच्या लहान बालकाचा समावेश आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकने जवळपास 500 मीटर अंतरापर्यंत स्कूटीला फरफटत नेले. त्यामुळे स्कुटीवर बसलेले तिघेजण रक्तबंबाळ होऊन अत्यंत गंभीर अवस्थेत रस्त्यावर खाली पडले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र उपचार सुरू करण्याआधी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी उपचार करण्याआधी त्यांना मृत घोषित केले. तिघांच्या अपघाती मृत्यूने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. एका निष्पाप चिमुरड्याला ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे प्राण गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातानंतर ट्रक चालकाने काढला पळ
हा अपघात प्रचंड भीषण स्वरूपाचा होता, असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. भरधाव वेगातील ट्रकच्या चालकाने स्कुटीला धडक दिल्यानंतर कारवाईच्या भीतीने ट्रक न थांबवण्याचा पवित्रा घेतला होता. बेदरकार ट्रक चालकाला थांबण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी केला होता. मात्र संबंधित ट्रक चालकाने रहिवाशांच्या इशाऱ्याला न जुमानता तेथून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर तिघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. सध्या तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
अपघातात तीन वर्षाच्या बालकाचाही मृत्यू
ट्रक चालकावर बेदरकार ड्रायव्हिंगसह तिघांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांना पोलिसांनी बरेली रुग्णालयात नेले होते, मात्र तेथील डॉक्टरांनी स्कुटीवरील तिघांनाही मृत घोषित केले. अवघ्या तीन वर्षांच्या बालकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्यामुळे परिसरात तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. या अपघात प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला वेळीच अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.