12 मार्च 1993 : टायगर मेमनने मुंबई सिरियल ब्लास्टसाठी भावजयीच्या व्हॅनचा वापर केला, त्यामुळे कटाचा उलगडा झाला…

केंद्र सरकारने मुंबईतील 12 मार्च 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांच्या केंद्र स्थानी असलेल्या टायगर मेमनची माहिम येथील 'अल हुसेनी' इमारतीतील मालमत्ता ताब्यात घेतली आहे. याच इमारतीतील गॅरेजमध्ये मुंबई ब्लास्टची स्फोटकं आणि शस्रास्रं उतरली होती.

12 मार्च 1993 : टायगर मेमनने मुंबई सिरियल ब्लास्टसाठी भावजयीच्या व्हॅनचा वापर केला, त्यामुळे कटाचा उलगडा झाला...
Tiger Memon
Follow us
| Updated on: Sep 02, 2024 | 3:23 PM

मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेचा आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा साथीदार मुस्ताक ऊर्फ टायगर मेमन याची माहीम येथील प्रॉपर्टी केंद्र सरकारच्या ताब्यात देण्याचे आदेश विशेष टाडा कोर्टाने दिले आहेत. आतापर्यंत ही मालमत्ता मुंबई हायकोर्टाच्या ताब्यात होती. टायगरचा भाऊ याकुब मेमनला साल 2015 मध्ये फाशी देण्यात आली होती. त्याला हुतात्मा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आणि त्यावरुन राजकारण देखील रंगले होते. कुख्यात आरोपी टायगर मेमन हा त्याची पत्नी शबानासह मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर फरार झालेला आहे. माहिमच्या अल हुसैनी इमारतीत त्याच्या कुटुंबियाचे तीन फ्लॅट आहेत. या मालमत्तेवर साल 1994 मध्ये टाडा कोर्टानेच जप्ती आणली होती. कोण आहे टायगर मेमन ? ज्याने माफीया डॉन दाऊद इब्राहिमच्या मदतीने साल 12 मार्च 1993 च्या देश हादरविणाऱ्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा कट रचला ? पाहूयात….

■ काळा शुक्रवार !

6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर मुंबईसह देशभर दंगली उसळल्या होत्या. त्यानंतर देशातील हिंदूत्ववाद्यांना धडा शिकविण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संघटनेने देशाची राजधानी मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्यासाठी कट रचला. त्यासाठी दुबईत माफीया डॉन दाऊद इब्राहिम, तस्कर मुस्ताक ऊर्फ टायगर मेमन आणि मोहम्मद उमर डोसा यांची मदत आयएसआयने घेतली. या त्रिकुटाने मुंबईतील दंगलीत होरपळलेल्या मुस्लीम तरुणांचा वापर करुन हिंदूत्ववाद्यांचा बदला घेण्यासाठी दुबईत त्यांना बोलावून घेतले. त्या ठिकाणी कुराणची शपथ त्यांना देण्यात आली. मुंबईतील बॉम्बस्फोटातील कटाची कुठेही वाच्यता न करण्याची शपथही या तरुणांकडून घेण्यात आली. दाऊद आणि टायगर मेमन यांनी मुंबईतील दंगलीत माथी भडकलेल्या या 27 जणांना बॉम्ब बनविणे आणि शस्रास्रे हाताळण्याच्या प्रशिक्षणासाठी दुबई मार्गे पाकिस्तानात पाठविले.

■  ‘अल हुसेनी’च्या गॅरेजमध्ये स्फोटकं आणि शस्रास्रे

रायगडच्या कस्टम आणि पोलीस अधिकाऱ्यांना लाच देऊनटायगर मेमनच्या उपस्थितीत दिघी आणि शेखाडी बंदरात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आरडीएक्स, एके -56 रायफल, हातबॉम्ब, रिव्हॉल्व्हर आदी मोठा शस्त्रसाठा उतरविण्यात आला. टायगर मेमनने बॉम्बस्फोट कसे करायचे, शस्त्रं कशी चालवायची याचे प्रशिक्षण रायगडमधील संधेरी आणि बोरघाटात तरुणांना दिले होते. मुंबईत स्फोट घडविण्याआधी टायगर मेमनच्या माहीम येथील ‘अल हुसेनी’ या इमारतीच्या गॅरेजमध्ये स्फोटकं आणि शस्रास्रे पाठविण्यात आली. त्या ठिकाणी टायगरने बहुसंख्य आरोपींना एकत्र बोलावले होते. टायगरच्या उपस्थितीत प्रत्येक वाहनात आरडीएक्स , डिटोनेटर आणि टायमर लावून भरण्यात आले होते. आणि सकाळी प्रत्येकाला जबाबदारी सोपवून स्फोटकं भरलेल्या वाहनांचे वाटप करण्यात आले. स्फोटकाचं वाटप झाल्यानंतर टायगर मेमन त्याच रात्री आपल्या घराला टाळे लावून पाकिस्तानात पळून गेला. तर त्याची सारी फॅमिली 3 मार्चलाच दुबईमार्गे पाकिस्तानात पोचली होती.

प्लाननूसार शुक्रवार, 12 मार्च 1993 रोजी मुंबईत एकामागोमाग साखळी बॉम्बस्फोट घडले. आरोपी कोणता ना कोणता पुरावा मागे ठेवतोच. त्यानूसार मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडविणाऱ्या टायगर मेमननेच आपल्या कृत्याचे पुरावे मागे ठेवले. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजप नगरसेवकांवर हल्ला करायला निघालेल्या आरोपींनी सेंच्युरी बाजार येथे झालेल्या बॉम्बस्फोटामुळे घाबरून मारुती व्हॅन तेथे रस्त्यात टाकून ते पसार झाले.

ही रस्त्यात बेवारस टाकून दिलेली मारुती व्हॅन पुढे या बॉम्बस्फोट मालिकेला कलाटणी देणारी टळली. कारण ही मारुती व्हॅन टायगर मेमनच्या भावजयीच्या नावावर असल्याचे उघड झाले.त्यानंतर टायगर मेमनची मैत्रीण रोमा सापडली. मग हवालाचा पैसा पुरविणारा मूलचंद शहा पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर टायगरचा मॅनेजर मुकादम देखील सापडला. हळूहळू बॉम्बस्फोटाचे सारे धागेदोरे उलगडले. बोगस नावाने वाहनं खरेदी करणारे, प्लांट करणारे, वाहनांत आरडीएक्स भरणारे, वाहतूक करणारे असे अनेक जण पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी मुंबई, रायगड येथून 189 आरोपींना एकामागोमाग जेरबंद केले.

त्यात तत्कालिन अतिरिक्त कस्टम कलेक्टर सोमनाथ थापा, कस्टम अधीक्षक मोहम्मद सय्यद, सहाय्यक कस्टम कलेक्टर रणजितकुमार सिंग प्रसाद ,कस्टम इन्स्पेक्टर जयवंत गुरव, श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे फौजदार विजय पाटील आदी दीड डझन सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पुरावा न मिळाल्याने 27 जणांना डिस्चार्ज करण्यात आले.कुलाब्याच्या अबू ट्रॅव्हल्सचे मालक अबू आझमी यांच्या एजन्सी मार्फत आरोपींचे दुबईत जाण्याचे पासपोर्ट आणि तिकीटे तयार करण्यात मदत केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले.

दाऊद आणि टायगर अजूनही वॉण्टेडच !

दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन पोलिसांना शेवटपर्यंत सापडले नाहीत. परंतु टायगर मेमनच्या भावांचे कुटुंबाची वाताहत झाली. ज्यांनी बॉम्बस्फोट मालिकेत भाग घेतला त्यांच्या कुटुंबियांनाही वनवास भोगावा लागला. बॉम्बस्फोट खटल्यातील 17 आरोपी तर विविध कारणांनी खटल्याचा निकाल लागण्याआधीच मरण पावले.

■ कोर्टाचा काय निर्णय आला

मुंबईत 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी टायगर मेमन आणि त्याच्या नातलगांच्या माहीम येथील अल हुसैनी इमारतीतील तीन फ्लॅट केंद्र सरकारच्या ताब्यात देण्याचे आदेश विशेष टाडा न्यायालयाने दिले परवाच दिले आहेत. त्याचवेळी विशेष टाडा न्यायालयाने मालमत्ता जप्तीचा आदेशही रद्द केला आहे. आतापर्यंत ही मालमत्ता मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत होती.

अल हुसैनी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सचिवांनी हे तीन फ्लॅट दुरुस्ती आणि देखभालीची देय रक्कम, मालमत्ता कर आणि इतर खर्च आणि व्याजा अशा 41.46 लाख रुपयांच्या देण्यासाठी जप्त करण्याची मंजूरी मागितली होती.तसेच, या मालमत्तेबाबत पुनर्विकास करारनामा करण्यास देखील परवानगी द्यावी, अशी मागणीही सोसायटीने केली होती. मात्र, विशेष न्यायालयाने ही मागणी फेटाळली आणि ही मालमत्ता केंद्र सरकारच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत.

■ याकूब मेमनला फाशी

माहीममधील अल हुसैनी सहकारी गृहनिर्माण संस्थेची मालमत्ता तस्करी विरोधी आणि विदेशी चलन अफरातफर कायद्यांतर्गत जप्त केली होती. टायगर मेमनच्या भाऊ आणि आई आणि भावजयी कडे इमारतीत 22,25 आणि 26 क्रमांकाच्या तीन फ्लॅट होते, त्यातील एक फ्लॅट टायगरची आई हनीफा मेमन हिच्या नावावर होता. हनीफा यांची या प्रकरणातून निर्दोष सुटाका झाली होती आणि नंतर त्यांचा वार्धक्याने मृत्यू झाला. तर, टायगरची भावजय रुबिना मेमन हिच्या नावावर एक फ्लॅट होता तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर टायगरची पत्नी शबाना हिच्या नावावर तिसरा फ्लॅट असून ती टायगर सोबत फरारी आहे. ही मालमत्ता 1994 मध्ये टाडा कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली होती. त्यानंतर, ती उच्च न्यायालयाच्या महानिबंधक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली. टायगर याचा भाऊ याकूब मेमन याला या प्रकरणी टाडा कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला 2015 मध्ये फाशी देण्यात आली.

ब्लॅक फ्रायडे !

■12 मार्च 1993 च्या बॉम्बस्फोट मालिकेचा घटनाक्रम

बॉम्बस्फोटाचे ठिकाणवेळमृत्यूजखमी
मुंबई शेअर बाजारदु. 1.30 वा.84217
काथा बाजार2.15 वा.0421
शिवसेना भवन 2.30 वा.0450
सेंच्युरी बाजार2.45 वा.113227
माहीम कॉजवे2.45 वा.36
एअर इंडिया 3.00 वा.2087
झवेरी बाजार 03.05 वा.1757
हॉटेल सी रॉक 03.10 वा.--
प्लाझा सिनेमागृह 03.13 वा.1037
जुहू सेंटॉर हॉटेल03.20 वा.-3
सहार एअरपोर्ट हॉटेल03.30 वा.--
एअरपोर्ट सेंटॉर हॉटेल 03.40 वा.28
एकूण257713

■ बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज। दुपारी 1.30 वा.

12 मार्चची ती आळसावलेली दुपारी होती आणि बहुतेकांची जेवणाची सुटी झालेली होती.हा शुक्रवार अनेकांची आयुष्यं उद्ध्वस्त करुन गेल्याने ‘ब्लॅक फ्रायडे’ म्हणून ओळखळा जातो! फोर्ट येथील शेअर बाजाराच्या खाऊ गल्लीत जेवणासाठी बाहेर पडलेले तरुण आणि अबालवृद्ध गाड्यांवर आवडत्या पदार्थांवर ताव मारीत असतानाच स्टॉक एक्स्चेंज इमारतीमध्ये कानाचे पडदे फाटणारा मोठा आवाज झाला आणि धुराचे लोट उसळले.देशाच्या आर्थिक चक्र चालणाऱ्या शेअर बाजार इमारतीच्या तळमजल्यातील कारमध्ये हे बॉम्ब पेरण्यात आले होते. रक्ताचे पाट वाहणारा हा पहिला स्फोट झाला.

■ काथा बाजार। दुपारी 2.15 वा.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमधील जखमींना रुग्णालयात हलविण्याचे काम सुरू असतानाच दुपारी 2 . 15 वाजता मशीद बंदरजवळील काथा बाजारात आरडीएक्स भरून पार्क केलेल्या स्कूटरचा ( नरसी नाथा स्ट्रीटवर ) स्फोट झाला.

■ शिवसेना भवन । दुपारी 2.30 वा.

शिवसेना भवनजवळील लकी पेट्रोल पंप उडवून शिवसेना भवनाला उद्धवस्त करण्याचा आरोपींचा डाव सुदैवाने फसला.शिवसेना भवनाजवळील लकी पेट्रोल पंपाजवळ मोहम्मद उस्मान अहमद जान खान आणि मोहम्मद युसुफ पावले यांना आरडीएक्सनी भरलेली मारुती कार ठेवता आली नाही. पोलिसांनी हटकल्यामुळे त्यांनी ती दूरवर पार्क केली. तरीही या स्फोटात चार जण ठार आणि पन्नास जण जखमी झाले.शिवसेना भवनजवळच्या इमारतींचे मात्र मोठे नुकसान झाले.

■ एअर इंडिया । दुपारी 2.30 वा.

काथा बाजार येथील धान्य आणि मसाल्याच्या होलसेल मार्केटमध्ये बॉम्बस्फोट घडवून हिंदूंना धडा शिकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींनी स्टॉक एक्स्चेंजपासून जवळच असलेल्या एअर इंडियाच्या गगनचुंबी इमारतीच्या आवारातही शक्तिशाली बॉम्बस्फोट घडवून आणला. नरिमन पॉइंट येथे देशी परदेशी बँका, आंतरराष्ट्रीय कंपन्या तसेच विविध देशांचे दूतावास आहेत. एअर इंडियाच्या तळमजल्यावरील ओमान बँकेसमोरच आरडीएक्सने भरलेली अॅम्बेसेडर कार ठेवली होती. त्याचा स्फोट होऊन त्यात20 जण ठार, तर 87 जण जखमी झाले. एअर इंडिया इमारत तसेच इतर इमारती आणि कारचा अक्षरश:चुराडा झाला.

■ सेंच्युरी बाजार । दुपारी 2.45

वरळीच्या सेंच्युरी बाजार येथील पासपोर्ट कार्यालयाजवळ झालेल्या स्फोटात एक डबलडेकर बेस्ट बस प्रवाशांसह हवेत उडाली. बसचे छप्पर शेजारच्या नेहरूनगर झोपडपट्टीत भिरकावलं गेलं. मानवी मृतदेहांचा अक्षरशः सडा पडला. जवळचे रहिवाशी भयभीत झाले. स्फोटामुळे जवळपासच्या वाहनांनाही आग लागली.वरळीच्या या स्फोटात सर्वाधिक 113 जण ठार झाले, तर 227 जण जखमी झाले.मुंबईतील हा सर्वात भीषण बॉम्बस्फोट होता. अब्दुल गनी इस्माईल तुर्क याने आपल्याकडील कमांडर जीपचा वापर करीत सेच्युरीबाजाराजवळ वरळीत हा भीषण बॉम्बस्फोट घडविला.

■ माहीम कॉजवे। दुपारी 2.45

माहीमच्या मच्छीमार कॉलनीच्या दिशेने मारुती व्हॅनमधून आलेल्यांनी हातबॉम्ब फेकले. त्यात 3 जण ठार तर 6 जण जखमी झाले.

झवेरी बाजार । दुपारी 3.05

मोहम्मद शाहेब मोहम्मद कासम घनसार या आरोपीने झवेरी बाजारातील शेख मेमन स्ट्रीट आणि मिर्झा स्ट्रीटच्या कोपऱ्यावर एक स्कूटर पार्क करून बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यात 17 पादचारी ठार झाले तर 57 जखमी झाले.

■ हॉटेल सीरॉक । दुपारी 3.10

वांद्रे पश्चिमेच्या सीरॉक या पंचतारांकित हॉटेलातील 18 व्या मजल्यावरील 1840 क्रमांकाच्या महागड्या सुटमध्ये आरोपी परवेज नासीर अहमद शेखने आरडीएक्सने भरलेली एक सुटकेस ठेवली. हा रुम 11 मार्च रोजीच बुक करून आरोपीनी ताब्यात घेतला होता. दरम्यान, ठेवलेल्या सुटकेसचा स्फोट झाला, परंतु सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. परंतु हॉटेलचे सुमारे 9 कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचे नुकसान झाले.

■ प्लाझा सिनेमा । दुपारी 3.13 वा.

प्लाझा सिनेमागृहातून बाहेर पडलेले 10 प्रेक्षकांचा प्लाझा सिनेमागृहाच्या आवारातच झालेल्या स्फोटात मृत्यू झाला तर 37 जण जखमी झाले.आरोपी असगर युसूफ मुकादम ऊर्फ मुन्ना आणि शाहनवाज अब्दुल कादर कुरेशी या दोघांनी आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली लाल रंगाची मारुती व्हॅन प्लाझाच्या आवारात पार्क केली होती.

■ सेंटॉर हॉटेल जुहू । दुपारी 3.20

आरोपी मोहम्मद मुस्ताक मुसा तारानी यांनी सांताक्रुझ, जुहू तारा रोडवरील सेंटॉर हॉटेलमधील 3078 क्रमांकाच्या खोलीत सुटकेस बॉम्ब ठेवून स्फोट घडविला. त्यात तीन जण जखमी झाले, तर दोन कोटी दहा लाख रुपयांची आर्थिक हानी झाली.

■ सहार एअरपोर्ट। दुपारी3.30 वा.

मुंबईत बॉम्बस्फोट मालिका सुरू असतानाच मोटारसायकलवरून फिरणाऱ्या नासीमअसरफ शेख मोहम्मद आणि मोहम्मद इकबाल मोहम्मद युसुफ शेख यांनी सहार येथील छत्रपती शिवाजी या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणपुलावरून हातबॉम्ब फेकले इंडियन एअरलाईन्सच्या स्टाफला ठार मारण्याचा व ‘रनवे’वर उभ्या असलेल्या विमानाचे नुकसान करण्याचा या आरोपींचा प्रयत्न होता. परंतु तो फसला गेला बॉम्ब फेकले गेले. परंतु कोणतीही जीवित हानी झाली नाही.

■ एअरपोर्ट सेंटॉर हॉटेल। दुपारी 3.40 वा.

अन्वर हाजी थेबा या आरोपीने सांताक्रुझ एअरपोर्ट येथील सेंटॉर हॉटेलमध्ये पहिल्या मजल्यावरील 157 क्रमांकाच्या रूममध्ये सुटकेस बॉम्ब ठेवून पलायन केले. त्यावेळी स्फोट होऊन त्यात 2 जण ठार तर 8 जण जखमी झाले. हाही सूट एक दिवस अगोदर बुक करून ठेवण्यात आला होता.

■ सुटकेस बॉम्ब

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, काथा बाजार, सेना भवन, सेंच्युरी बाजार, एअर इंडिया, झवेरी बाजार आदी ठिकाणी आरोपींनी 1 अॅम्बेसेडर, 2 मारुती व्हॅन, 3 मारुती- 800, 1 कमांडर जीप, 1 मोटारसायकल, 4 स्कूटर आदी वाहनांचा वापर केला, तर माहीम कॉजवे येथे हातबॉम्बचा वापर केला. हॉटेल सी रॉक, जुहू सेंटॉर, एअरपोर्ट सेंटॉर हॉटेल या ठिकाणी मात्र आरोपींनी सुटकेसमध्ये स्फोटकं भरून बॉम्बस्फोट घडवून आणले.

■ मारुती व्हॅन सापडली आणि कट उलगडा

मध्य रेल्वेच्या दादर येथील स्वामीनारायण मंदिरासमोर मो. इकबाल युसुफ शेख या आरोपीला आरडीएक्सनी भरलेली स्कूटर ठेवायची होती. परंतु तेथील वाहतूक पोलिसाने हटकल्यामुळे इकबालने नायगाव क्रॉस रोड येथे स्कूटर पार्क केली, तर इम्तियाज युनिसमियाँ गावठे याने झवेरी बाजारातील धनजी स्ट्रीट येथे आरडीएक्सची स्कूटर पार्क केली. परंतु सुदैवाने या दोन्ही स्कूटरचा स्फोट झाला नाही. टायमर सेट करताना चूक झाली आणि अनेकांचे प्राण वाचले. बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या अधिकाऱ्यांनी आपले जीव धोक्यात घालून बॉम्ब निकामी केले.

■ नगरसेवकांच्या हत्येचा कट फसला

मुंबई महानगरपालिकेच्या बोरीबंदर येथील शिवसेना-भाजपच्या कार्यालयात घुसून तेथे एके-56 रायफलमधून अंदाधुंद गोळीबार करायचा आणि शिवसेना-भाजप नगरसेवकांना ठार मारण्याची योजना होती. मारुती व्हॅनमधून हे आरोपी एके- 56 रायफल, हातबॉम्ब, पिस्तूल आदी शस्त्रांसह टायगर मेमनच्या माहीम येथील ‘अल हुसेनी’ इमारतीमधून बोरीबंदरच्या दिशेने निघाले होते. परंतु वरळी, सेंच्युरी बाजार येथे घडलेल्या स्फोटांमुळे सर्वत्र वाहतूक खोळंबली. जवळच स्फोट झाल्याने या आरोपींच्या मारुतीची तावदानेही फुटली. त्यामुळे घाबरून गाडीतील सर्व आरोपींनी तो शस्त्रसाठा आणि गाडी तेथेच सोडून पलायन केले आणि शिवसेना-भाजप नगरसेवकांच्या हत्येचा कट फसला. वरळी सीमेन्स कंपनीजवळ बेवारस पडलेली मारुती वरळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णू शिंदे, फौजदार दिनेश कदम यांनी पाहिली आणि या बॉम्बस्फोट मालिकांवर प्रकाश पडला. टायगर मेमनचा भाऊ सुलेमान मेमन याची पत्नी रुबीना हिच्या नावावर मारुती व्हॅनचे नोंदणी असल्याचे उघड झाले. तेथूनच पोलिसांना या संपूर्ण कटाचा उलगडा झाला आणि आरोपींना अटक झाली.

■ जंग-ए-बदर

महंमद पैगंबरने काफिरांविरुद्ध मक्केपासून काही अंतरावर असलेल्या ‘बदर’ या ठिकाणी इस्लाम धर्माची पहीली लढाई झाली होती. त्या लढाईत काफिरांना माघार घ्यावी लागली.त्यामुळे 12 मार्च हा पवित्र मानला जातो. त्या दिवशी रमझानचा सतरावा दिवस होता. ‘जंग-ए-बदर’ची लढाई महमद पैगंबरने याच दिवशी जिंकली. मग हाच दिवस काफिरांचा संहार करण्यासाठी का निवडू नये? असा सवाल मुंबईतून दुबईत गेलेल्या तरुणांना टायगर मेमनने केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.