Tomato Price : दरवाढीचा राग टोमॅटोवर, इतक्या घरात नो एंट्री!
Tomato Price : देशात टोमॅटोचे भाव गेल्या दीड महिन्यात गगनाला भिडेल आहेत. त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. अनेक घरांमध्ये टोमॅटोवर बहिष्काराचे अस्त्र चालविण्यात आले आहे. टोमॅटोला अनेक घरांमध्ये नो एंट्री करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : गेल्या दीड महिन्यांपासून देशातील विविध भागात टोमॅटोच्या किंमती (Tomato Price Hike) अनेक पटींनी वाढल्या. टोमॅटोला भूतो न भविष्यती इतका भाव मिळाला. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर झाला. 25-30 रुपये किलो मिळणारा टोमॅटो थेट 220 रुपयांवर पोहचला. काही शहरात तर दर 350 रुपयांच्या घरात पोहचले आहे. वाढलेल्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यांनी थेट टोमॅटोवरच बहिष्कार घातला. हा बहिष्कार अघोषीत आहे. जोपर्यंत भाव पूर्ववत होत नाहीत. तोपर्यंत देशातील लाखो कुटुंबांनी टोमॅटोला घरात नो एंट्री (No Entry) केली आहे. याविषयीचा एक सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये किती टक्के भारतीयांनी टोमॅटो खरेदी (Stopped Buying Tomato) थांबवली आहे, याचा उलगडा झाला आहे.
अचानक किंमतीत वाढ राजधानी दिल्लीत टोमॅटोच्या किंमती 24 जून रोजी 20-30 रुपये प्रति किलोग्रॅम हून थेट 180 रुपयांवर पोहचल्या. तर उत्तम दर्जाच्या टोमॅटोला अधिक म्हणजे 220 रुपये भाव मिळाला. इतर शहरांमध्ये टोमॅटोचे भाव गगनाला पोहचले आहेत. चंदीगड आणि गाझियाबाद सारख्या शहरात एक किलो टोमॅटो 250-350 रुपयात मिळत आहेत. दक्षिण आणि पश्चिम भारतात किंमती 150-180 रुपये किलो अशा आहेत.
दक्षिणेतील राज्यांत उत्पादन सध्या दक्षिणेतील राज्यातील उत्पादनावर किंमती अवलंबून आहेत. टोमॅटोचे उत्पादन देशात जवळपास सर्वच राज्यात घेण्यात येते. पश्चिमी आणि दक्षिणेतील राज्यात टोमॅटोचे उत्पादन जास्त होते. या भागात जवळपास 56 ते 58 टक्के उत्पादन घेण्यात येते. याभागात उत्पादन वाढले आहे. त्याचा फायदा उत्तर भारताला होणार आहे.
नेपाळमधून रोज 5 टन टोमॅटोची निर्यात भारतात टोमॅटोची मागणी वाढताच नेपाळमधून रोज 5 टन टोमॅटोची निर्यात करण्यात येत आहे. नेपाळमध्ये यावेळी टोमॅटोचे उत्पन्न जास्त आहे. तसेच फुलकोबी आणि पालक यांचे उत्पन्न पण जास्त आहे. त्यामुळे उत्तर भारताला आता नेपाळच भाजीपाला पुरविणार असेच सध्याचे चित्र आहे.
इतक्या लोकांचा समावेश लोकलसर्किलने हा सर्वे केला आहे. भारतातील 342 जिल्ह्यांमध्ये हा सर्वे करण्यात आला. यामध्ये 22000 नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. या सर्वेत 65 टक्के पुरुष आणि 35 टक्के महिलांनी भाग घेतला. 42 टक्के मेट्रो, 34 टक्के मोठे शहर, 24 टक्के निमशहरातील आणि इतर लोक ग्रामीण भागातील होती. या सर्वेतील जवळपास 87 टक्के लोकांनी हे मान्य केले की, त्यांनी एक किलो टोमॅटोसाठी 100 रुपयांहून अधिक रुपये खर्च केले आहे.
काय सांगतो सर्व्हे या सर्व्हे नुसार, भारतात टोमॅटोच्या किंमती वाढल्यानंतर नागरिक टोमॅटोपासून चार हात दूर झाले. याविषयीचा एक सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार, 46 टक्के कुटुंबांनी 150 रुपये किलोने टोमॅटोची खरेदी केली. तर 14 टक्के लोकांनी टोमॅटो खरेदीच केला नाही. 68 टक्के लोकांनी टोमॅटोचा वापर निम्यावर आणला वा त्यापेक्षा कमी केला आहे.