तृणमूलचे घर फोडले, तो खूप छान खेळतोय, मग आरएसएसचे… ? ममता बॅनर्जी पुन्हा कडाडल्या
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली आहे. शहरातील सर्व प्रकारच्या अवैध अतिक्रमणांची यादी त्यांनी तयार केली आहे. या सर्व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अवैध धंद्यांवर कारवाई सुरु केली आहे. यावरून राजकारण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता आणि राज्यातील इतर शहरांतील अवैध अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशामध्ये फूटपाथवरील फेरीवाले हटवण्यापासून ते बेकायदा पार्किंगपर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे. राज्यातील अनेक भागात सरकारी जमिनींवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यावरील बेकायदा बांधकामांच्या तक्रारी येत आहेत. यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलीस, प्रशासन, नेते, आमदार यांनाही खडसावले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या 7 वर्षात किती जमीन हस्तांतरित झाली याची चौकशी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. एका गटाने तलाव भरून तीन मजली घर बांधले. हे घर आरएसएसच्या लोकांचे आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करताना अचानक आरएसएसचा उल्लेख का करण्यात आला, असा सवाल ममता यांनी केला.
पोलिसांनी तृणमूलचे ब्लॉक अध्यक्ष देबाशीष प्रामाणिक यांना अटक केली आहे. डबग्राममध्ये एका व्यक्तीची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांना अटक केली आहे. आमच्याच पक्षाच्या ब्लॉक अध्यक्षाच्या अटकेचे आदेश आम्ही दिले. मग, आरएसएसच्या व्यक्तीचे घर तोडल्यावर का टीका होते असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्री आणि नगरसेवकांना इशारा दिला. ज्या नगरसेवकाच्या परिसरात अनधिकृत बांधकाम होईल त्याला अटक करावी. सर्व प्रकारचे माफिया, वाळू माफिया, भूमाफिया हे सर्व काही खात आहेत. उजव्या हाताने ते पैसे घेतात आणि डाव्या हाताने भाजपला देतात. पण, मला त्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीपीएम नेते आणि वकील विकास रंजन भट्टाचार्य यांच्यावरही हल्लाबोल केला. बंगाली आणि बिगर बंगालींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. बंगालमध्ये शतकानुशतके वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतात. अनेकांनी बंगाली संस्कृती स्वीकारली आहे. युसूफ पठाण, कीर्ती आझाद, शत्रुघ्न सिन्हा यांना आम्ही आणले. त्यामुळे आमचे विरोधक बाहेरच्या संस्कृतीबद्दल बोलत आहेत. आता निवडणुकीनंतर बंगाली आणि गैर बंगाली अशी विभागणी केली जात आहे. आरएसएसला हेच हवे आहे. तो खूप छान खेळतोय. पण, हा विचार टाळायला हवा असेही त्या म्हणाल्या.