नुकतेच उद्घाटन झालेल्या रेल्वे ट्रॅकवर झाला स्फोट, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 दिवसापूर्वीच उद्घाटन केलेल्य रेल्वे ट्रॅकवर स्फोट झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
अहमदाबादः उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गावर रात्री झालेल्या स्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. ओडा पुलावरून या स्फोटाचा आवाज आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळ धाव घेऊन पाहिल्यानंतर नवीन ट्रॅक खराब झाल्याचे त्यांना दिसून आल्यानंतर तातडीने या घटनेची माहिती ग्रामस्थांनी रेल्वेला कळवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचे मत रेल्वेने व्यक्त केले आहे.
उदयपूर-अहमदाबाद हा रेल्वे मार्ग 31 ऑक्टोबरपासूनच सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या ट्रॅकचे उद्घाटन करण्यात आले होते.
हा या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी ताराचंद मीना यांनी ओढा रेल्वे पुलाची पाहणी केली आहे. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनही या रेल्वे ट्रॅकची पाहणी केली आहे.
या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, नुकतेच या रेल्वे ट्रॅकचे उद्घाटन करण्यात आले होते.
त्यामुळे हा झालेला स्फोट अधिक गंभीर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले असून घटनास्थळाची पाहणी पोलिसांकडून सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. या पुलाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी ताराचंद मीणा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासोबतच आरोपींना लवकरात लवकर अटक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ही घटना उदयपूर-साळुंबर मार्गावरील ओडा रेल्वे पुलावर घडली आहे. ही घटना घडल्यानंतर स्फोटाचा मोठा आवाज आल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. स्फोट झाल्याचे समजताच गावातील नागरिक रेल्वे ट्रॅक पोहचून रेल्वे रुळांची पाहणी केली. त्यावेळी त्यांना तडे गेल्याचे दिसून आले.
त्यामुळे त्यांनी रेल्वे प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधून या घटनेची माहिती देण्यात आली. व ज्या ठिकाणी ही घटना घडली होती, त्या ठिकाणी लाल कापड बांधण्यात आले होते.