नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणी घटनापीठ सोमवारपासून बसणार आहे. सोमवारपासून घटनापीठाकडे सुनावणी होईल, अशी माहिती शिवसेना नेते आणि खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी दिली आहे. ते नवी दिल्लीत बोलत होते. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी काल होणार होती. मात्र न्यायालयाच्या (Supreme court) कामकाजाच्या यादीत या याचिकेचा समावेशच नव्हता. ही याचिका मेन्शन करण्याची विनंतीही करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने 29 ऑगस्टला याची सुनावणी ठेवली आहे. शिवसेना आणि शिंदे गट यांच्यासंदर्भातील वादावर घटनापीठ निर्णय देणार आहे. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना (Shivsena) तसेच महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातून याविषयी लवकरात लवकर निर्णय यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देसाई बोलत होते. उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
राज्यातील शिवसेनेला बंडाळीने ग्रासले आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता राज्याचा दौरा करणार आहेत. अनिल देसाईंनी याबाबतची माहिती दिली. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची आखणी पूर्ण झाली आहे. दौऱ्याचे वेळापत्रक ठरलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा लवकरच उद्धव ठाकरे दौरा करतील. त्याचबरोबर आदित्य ठाकरेदेखील पुन्हा एकदा दौरा करणार आहेत, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारवर अनिल देसाई यांनी टीका केली आहे. विरोधकांचे काम सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे लोकांच्या प्रश्नावर सरकार किती गंभीर आहे, असा टोला देसाई यांनी शिंदे गट आणि भाजपाला लगावला आहे. मुंबईकरांचे काम शिवसेनेने केलेले आहे. 5 वेळेहून अधिक मुंबईवर भगवा फडकत आहे, असे ते म्हणाले.
भाजपा आणि शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले, की इतरांसारखे आम्हाला नियोजन करण्याची गरज नाही. काम घेऊन लोकांसमोर आम्ही जाऊ. दरम्यान, सध्या विविध कायगदेशीर प्रक्रियांवर शिवसेना तोंड देत आहे. त्यावर ते म्हणाले, की कायद्याद्वारे ज्या गोष्टी होत आहेत ते अनिल परब पाहत आहेत. आम्हाला न्याय मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.