मुंबई : पाकिस्तानातून चार मुलांना घेऊन सीमा हैदर नेपाळमार्गे अनधिकृतरित्या भारतात आली. नेपाळमध्ये तिने सचिन मीणा याच्यासोबत लग्न केलं आणि आता भारतात संसार करत आहे. देशात कोणही कसंही सहज घुसखोरी करू शकते ही गंभीर बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सीमा हैदर हिची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी झाली. चौकशीत तपास यंत्रणांच्या हाती अजून तरी तसं काही लागलं नाही. असं असताना आता सीमा हैदर हिला चित्रपट आणि निवडणुकांच्या ऑफर मिळू लागल्या आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाकडून सीमा हैदर हीला निवडणुकीची ऑफर देण्यात आली होती. आता यावर खुद्द केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“सीमा हैदर हिच्यासोबत आमच्या पार्टीचा काही एक संबंध नाही. सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली आहे. गेमच्या माध्यमातून तिची ओळख सचिन मीणा याच्यासोबत झाली आणि इतक्या मुलांना घेऊन इथे आली आहे. मला वाटते तपास यंत्रणा चौकशी करत आहे. आमचे किशोर मासूम हे देवर गावातील मूळ निवासी आहेत. त्याच्या बाजूलाच सचिन मीणा राहात होता. किशोर मासूम मुंबईत राहतो आणि मला न विचारता असं वक्तव्य केलं.”, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं.
“सीमा हैदर हिला पक्षात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर तिला तिकीट द्यायचंच झालं तर भारतातून तिला पाकिस्तानचं तिकीट देऊ. पण पक्षाचं तिकीट देण्याचा प्रश्नच नाही.”, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट करून टाकलं.
#WATCH | Delhi: On Pakistani national Seema Haider, Ramdas Athawale, President, Republican Party of India (Athawale) & Union Minister says, "Our party has no relations with Seema Haider. She has come from Pakistan to India…There is no question of including her in our party…If… pic.twitter.com/o735VvRh4u
— ANI (@ANI) August 4, 2023
आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मासूम किशोर यांनी सीमा हैदर हिला पक्षाकडून ऑफर दिल्याचं सांगितलं होतं. त्यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पूर्णविराम लावला आहे.
सीमा हैदर हिच्या पतीचं नाव गुलाम हैदर होतं. पण तिला सोडून तो सौदी अरबला गेला आहे. मारहाण करत असल्याचं सीमा हीने तपास यंत्रणांना सांगितलं आहे. तिच्या पतीनेच फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करून सांगितलं की, त्याची पत्नी सीमा हैदर पाकिस्तान सोडून भारतात गेली आहे. तसेच तिच्यासोबत लहान मुलं आहेत. गुलाम हैदर याने भारत सरकारकडे मदत मागत तिला पाकिस्तानात परत पाठवण्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनधिकृतपणे भारतात आलेल्या सीमा हैदर हीचं पितळ उघडं पडलं.