देशातील एक असं रहस्यमयी मंदिर, जिथे पूजा करण्यासाठी पुरुषांना करावं लागतं अनोखं काम
केरळमधील कोट्टनकुलंगरा श्री देवी मंदिरात एक अनोखी परंपरा आहे, जिथे पुरुष देवीची पूजा करण्यासाठी महिलांचा वेश धारण करतात. ही परंपरा चामयाविलक्कू उत्सवाशी जोडलेली आहे जी दरवर्षी मार्च महिन्यात साजरी केली जाते. या परंपरेमागील पौराणिक कथा मंदिराच्या स्थापनेशी जोडली आहे.
आपल्या देशात विविध संस्कृती, विविध धर्म आणि जाती एकत्र नांदतात. या सर्वांचे आचारविचार आणि प्रथा परंपरा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाची धार्मिक मान्यताही वेगवेगळी आहे. त्या मान्यतेनुसार हे सर्व लोक वागत असतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा मंदिराबाबत सांगणार आहोत, ज्याची परंपरा खरोखरच अनोखी आहे. केरळमधील हे मंदिर आहे. या मंदिरात पुरुषांना पूजा करायची असेल तर त्यांना महिलांसारखं नटून सजून मंदिरात जावं लागतं. त्यानंतरच त्यांना मंदिरात प्रवेश मिळतो. ही अनोखी प्रथा का पडली? काय आहे या मागचं लॉजिक?
केरळमध्ये दरवर्षी चामयाविलक्कू नावाचा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव कोल्लम येथील कोट्टनकुलंगरा श्री देवी मंदिरात आयोजित केला जातो. हा उत्सव मार्च महिन्यात साजरा केला जातो. मार्च महिन्यात 10 ते 12 दिवस हा उत्सव साजरा होतो. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी पुरुष महिलांसारखे नटतात. महिलांसारखी साडी नेसतात. दागिने घालतात. मेकअप करतात. केसांना फूल लावतात. दाढी मिश्या काढून टाकतात. अगदी महिलांसारखेच नटून सजून घेतात.
अन् देवी प्रकट झाली
मंदिराच्या आजूबाजूला राहणारे पुरुष तर या उत्सवात भाग घेतातच. केरळच्या इतर भागातूनही अनेक लोक या मंदिरात पूजा करायला येतात. तेही या उत्सवात भाग घेतात. एवढेच नव्हे तर तृतियपंथीय सुद्धा या उत्सवात भाग घेतात. धार्मिक मान्यतेनुसार, अनेक वर्षांपूर्वी काही गुराखी या ठिकाणी गायी चारायला येत होते. त्यावेळी ते मुलींचा वेश करून खेळ खेळायचे. येथील एका दगडाजवळ ही मुले खेळायचे. या दगडालाच ते देव मानायचे. असं सांगितलं जातं की एके दिवशी या दगडातून देवी प्रकट झाली. ही बातमी गावात वेगाने पसरली. त्यानंतर देवीच्या सन्मानार्थ या ठिकाणी मंदिर उभारण्यात आलं. आणि त्यानंतर ही प्रथा सुरू झाली.
हातात जळता दिवा
अशा प्रकारे मंदिरात पुरुष महिलांचा वेश करून जायला लागले. देवीची पूजा करायला लागले. पुरुष महिलांसारखी वेशभूषा करून हातात जळता दिवा घेऊन मंदिरात जातात. पहाटे 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत पूजा करण्याची सर्वात शुभ वेळ मानली जाते. यावेळी पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होते, असं सांगितलं जातं. त्यामुळेच या ठिकाणी येणाऱ्या पुरुषांची संख्या दरवर्षी वाढताना दिसत आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )