नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी आणि राजदची आघाडी झाली आहे. शिवसेनेने मात्र या आघाडीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सपा, राष्ट्रवादी आणि राजदच्या आघाडीला पाठिंबा का द्यावा?, असा सवालच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. (UP assembly polls: Shiv Sena to contest UP polls alone, says sanjay raut)
संजय राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. सपा, राष्ट्रवादी राजदची आघाडी होत असली तरी उत्तर प्रदेश बाबत आमची काही भूमिका नाही. का पाठिंबा द्यावा या आघाडीला? शिवसेना निवडणुका लढवेल, पण स्वतंत्रपणे लढवेल. त्यांची आघाडी त्यांच्यापाशी. त्यांच्या आघाडीला शुभेच्छा आहेत. त्यांनी विजय प्राप्त करावा, याही शुभेच्छा आहेत. आम्ही उत्तर प्रदेशात आमच्या ताकदीनुसार निवडणूक लढवतोय. सपाशी अजिबात युती होणार नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
सर्वांनी एकत्र यावं, अशी ममतादीदींची इच्छा आहे. त्यांचं विधान ऐकलं. आधी एकत्र येऊ. काम करू. नेता आणि चेहरा नंतर ठरवू, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या कामात त्यांना यश मिळो ही आमची सदिच्छा आहे, असं सांगतानाच नेता आणि चेहरा ठरवणं कठिण आहे हा तुमचा गैरसमज आहे. योग्य वेळ येताच एकमत होतं. गरजेतून आणि संकटातून असे चेहरे आणि नेतृत्व निर्माण होत असतं, असंही त्यांनी सांगितलं.
काल विरोधकांची बैठक झाली. यावेळी तृणमूलचे खासदार उपस्थित नव्हते. त्याबाबतही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संसदेत गोंधळ घालण्यात काँग्रेसच्या बरोबर तृणमूलचे खासदार होते. त्याचवेळी तृणमूलची बैठक होती. ते तिकडे गेले असतील. प्रत्येक बैठकीला तृणमूलचे नेते असतात. काल सकाळी होते आजही आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
ममता बॅनर्जी आज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ममता बॅनर्जी यांचे शरद पवारांशी जिव्हाळ्याशी संबंध आहेत. उद्धव ठाकरेंशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नुसती भेट घेतली की भेट झाली यावर नाती टिकत नसतात. त्यांचे संबंध सर्वांशी चांगले आहेत. भेटीगाठी होत राहतात. अजून दोन दिवस आहेत त्या दिल्लीत. त्या गडकरींना भेटल्यातर तुम्हाला त्याची चिंता का? असा सवाल करतानाच राज्याच्या मुख्यमंत्री जेव्हा दिल्लीत येतात. तेव्हा आपल्या राज्यातील अनेक विकास कामांची जंत्री घेऊन येतात. गडकरींकडे महामार्ग रस्ते, पायाभूत सुविधा हे खातं आहे. बंगालमधील अशा कामासाठी त्या गडकरींना भेटत असतील तर मीडिया आणि राजकारण्यांना भुवया उंचावण्याचं काही कारण नाही, असं ते म्हणाले. ममतादीदी उद्धव ठाकरेंना भेटणार का मला माहीत नाही. पण जेव्हा ममतादीदी मुंबईत येतात तेव्हा त्या उद्धव ठाकरेंना भेटतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सरकारला संसद चालू द्यायची नाही. सरकार विरोधी पक्षावर ठपका ठेवत आहे. पण सरकारलाच गोंधळ निर्माण करायचा आहे. सरकारला पेगाससवर सत्य ऐकण्याची भिती वाटते. विरोधी पक्षाकडून त्यांना जे ऐकावं लागेल त्याबाबत त्यांच्या मनात धास्ती आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सत्य ऐकण्याची तयारी ठेवली पाहिजे. पेगासस असेल, कृषी कायदे असेल… विरोधी पक्ष हा जनतेचा आवाज असतो. त्याचं ऐकणं लोकशाहीत प्रत्येक सरकारला बंधनकारक जरी असलं तरी केंद्रातलं सरकार त्या संदर्भात सतत माघार घेताना दिसतंय. सरकार या गोंधळास प्रवृत्त करतंय. हा गोंधळ असाच राहावा आणि संसद ठप्प राहावी ही सरकारची इच्छा दिसते. त्याचं कुणी समर्थन करू नये, असं सांगतानाच अनेक प्रकारची विधेयकं कोणतीही चर्चा न करता पास केली जात आहेत. सरकारला हेच हवं आहे. त्यामुळे सरकार पेगाससवर चर्चा करत नाही, असा आरोप त्यांनी केला. (UP assembly polls: Shiv Sena to contest UP polls alone, says sanjay raut)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 29 July 2021 https://t.co/flql7lbdgu #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 29, 2021
संबंधित बातम्या:
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण, राज ठाकरेंकडून पायावर डोकं ठेवून नमस्कार
सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग, आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा
संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावं, अमोल कोल्हे म्हणतात, अभिमान असेल, पण…
(UP assembly polls: Shiv Sena to contest UP polls alone, says sanjay raut)