नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह भाजप विरोधकांना मोठा फटका सहन करवा लागलाय. तर भाजपचा विजयाचा वारू पुन्हा एकदा चौफेर उधळल्याचं पाहायला मिळालं. अशावेळी संयुक्त पुरोगामी आघाडी (United Progressive Alliance) अर्थात यूपीएच्या अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सध्या यूपीएचं अध्यक्षपद सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे आहे. मात्र, यूपीएचं अध्यक्षपद शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे देण्याची मागणी पुन्हा एकदा होऊ लागली आहे. आता ही मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं थेट राजधानी दिल्लीत केली आहे. महत्वाची बाब म्हणजे खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीत हा ठराव मंजूर करण्यात आलाय.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आज दिल्लीत पार पडली. या बैठकीत महत्वाचा ठराव मांडण्यात आला. या बैठकीला खुद्द शरद पवारही उपस्थित होते. यावेळी यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना देण्यात यावं असा ठराव सादर करण्यात आला आणि तो मंजूरही करण्यात आलाय. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा ठराव मंजूर करण्यात आल्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात आता पुन्हा एकदा यूपीए अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPA बाबत मोठं वक्तव्य केलं होतं. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी UPAचं पुनर्गठन व्हावं, असं म्हटलं. इतकच नाही तर UPAचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावं, असंही ते म्हणाले. राऊत यांनी या मुलाखतीत UPAच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. UPAचं नेतृत्व बदलून, ते अशा हाती देण्यात यावं ज्यांना विरोधक स्वीकारतील, असंही राऊत यांनी म्हटलं होतं.
‘काँग्रेस पक्ष मजबूत व्हायचं असेल तर UPA मजबूत करायला हवं आणि UPAला मजबूत करायचं असेल तर त्याचं नेतृत्व अशा व्यक्तीच्या हाती द्यावे जो अॅक्टिव्ह असेल आणि विरोधकांमध्ये त्यांच्या नावावर सहमती असेल’. तेव्हा संजय राऊतांना असं कुठलं व्यक्तीमत्व आहे ज्याच्या नावावर सहमती होईल, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राऊत यांनी आता तरी फक्त शरद पवार यांचंच नाव समोर येतं. काँग्रेस नेत्यांनी ते स्वीकारायला हवं. शरद पवार यांना UPAचा अध्यक्ष बनवल्यावर UPA अधिक मजबूत होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला होता.
‘संजय राऊत यांची वक्तव्य पाहता ते शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, असा प्रश्न पडला आहे. दिल्लीत यूपीए 2 स्थापन करण्याच्या हालचाली व त्यासाठी संजय राऊत यांनी शरद पवारांकडे यूपीएचे नेतृत्व सोपवावे, ही केलेली मागणी हास्यास्पद आहे. शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षात आहेत की शिवसेनेत हे तपासावे लागेल . तर संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. ‘सामना’चे संपादक आहेत हे माहिती आहे. परंतु ते शरद पवारांचे प्रवक्ते झाल्यासारखे बोलत आहेत’, अशी टीका नाना पटोले यांनी केली होती.
इतर बातम्या :