एका लग्नाची डेंजर गोष्ट… जेवण वाढण्यास उशीर झाला, नवरोबाने असं काही केलं की थेट पोलीस…
उत्तर प्रदेश राज्यात एका लग्नाच्या समारंभात भोजन पुरवण्यात थोडा उशीर झाल्यामुळे, विवाह अचानक रद्द करण्याचा धक्कादायक प्रसंग घडला आहे. विवाह हा खूप आनंदाचा आणि एकत्र येण्याचा क्षण असला तरी, अशा समारंभात अनेकदा छोट्या-मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो.
लग्न समारंभात उशीर होणं ही काही मोठी गोष्ट नाही. पण उत्तर प्रदेशातील चंदौली येथील प्रकरण जरा वेगळं आहे. या लग्नात मित्रांच्यासमोर जेवण वाढण्यात उशीर झाला म्हणून नवरोबा एवढा नाराज झाला की त्याने थेट लग्नच मोडलं हो. अख्खी वरात घेऊन तो थेट परत आला. घरी आल्यावर त्याने थेट आत्याच्या पोरीसोबतच निकाह लावून घेतला. या घटनेनंतर मुलीच्या घरचेही बरेच संतापले. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून न्यायाची मागणी केली. मुलांच्या घरच्यांकडून मुलींच्या घरच्यांना 1 लाख 60 हजार रुपये देण्याचं ठरल्यानंतर अखेर हा वाद मिटला.
उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथील हमीदपूर गावची रहिवासी रेशमा हिचा निकाह सहा महिन्यापूर्वीच गावातीलच मेहताब याच्याशी ठरला होता. त्यानुसार 22 डिसेंबर रोजी दोघांचा निकाह होणार होता. मुलीचे वडील गुजरातच्या सुरतमध्ये व्यवसाय करतात. तर मुलाच्या वडिलाचे हमीदपूरमध्ये चहापाणी आणि किराण्याचं दुकान आहे. लग्नाच्या दिवशी मुलीच्या घरच्यांनी संपूर्ण तयारी केली होती. ढोल ताशे वाजवत दुपारी 3 वाजता नवरीच्या घरी वरातही आली. नवरीच्या घरच्यांनी वऱ्हाडाला मिठाई भरवून त्यांचं स्वागतही केलं.
मित्रांनी टिंगल उडवली अन्…
मुलीच्या घरच्यांनी वऱ्हाडांना जेवण दिलं. त्यांची सर्व प्रकारे काळजी घेतली. जेवणावेळी नवरदेवही आपल्या मित्रांसोबत जेवायला बसला. त्यावेळी नवरदेवासाठी जेवण येण्याकरता उशीर झाला. त्यामुळे नवरदेवाच्या मित्रांनी त्याची टिंगल टवाळी करण्यास सुरुवात केली. सासूरवाडीत आपला मित्रांकडून आपला अपमान होत असल्याने मेहताब प्रचंड नाराज झाला.
त्यानंतर त्याने नवरीच्या घरच्यांवर राग काढण्यास सुरुवात केली. हे पाहून नवरदेवाचे वडील आणि इतर वऱ्हाडीही नाराज झाले. तर लग्नाला आलेले गावकरी दोघांमध्ये समझौता करण्यास धावला. दोन्ही पार्ट्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण नवरदेव काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने थेट वरातीसोबत घरी जाण्याचा निर्णय घेतला. लग्न अर्धवट टाकून, नवरीला सोडून तो आपल्या घरी आला.
आत्याच्या बहिणीशी विवाह
या घटनेमुळे नवरीच्या घरी मातम सारखी परिस्थिती झाली. संपूर्ण मंडपात स्मशान शांतता पसरली. अनेक लोक न जेवताच निघून गेले. नवरीच्या आईसाठी तर आकाश फाटलं. नवरीच्या आईचे रडून रडून बेहाल झाले. नवरीचे नातेवाईक त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. इकडे मात्र नवरदेवाच्या वडिलाने लग्नात आलेल्या त्याच्या बहिणीला तिच्या मुलीसोबत मुलाचा निकाह लावण्याची विनंती केली. बहीणही तयार झाली. त्यानंतर बहिणीच्या मुलीसोबत मेहताबचा निकाह लावण्यात आला. ही बातमी कळताच नवरीच्या घरच्यांच्या काळजात धस्स झाले. त्यामुळे त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलीस ऐकेना
रेशमाच्या आईवडिलांनी थेट मुगलसराय पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या औद्योगिक नगर पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकिकत ऐकवली. पण त्यांचं कोणीच ऐकलं नाही. त्यामुळे 24 डिसेंबर रोजी मुलीच्या घरचे थेट पोलीस अधिक्षक कार्यालयात गेले. तिथे त्यांनी सर्व हकिकत सांगितली. रेश्माची आई नसीरून निशा यांनी एसपी आदित्य लांग्हे यांच्याकडे पाच जणांविरोधात तक्रार देऊन न्यायाची मागणी केली.
तक्रारीत काय?
नवरीच्या आईने तक्रारीत सर्व गोष्टींचा उल्लेख केला. 200 लोक वरातीत आले होते. वऱ्हाडांचं स्वागत करतानाच आम्ही निकाहची तयारीही करत होतो. त्याचवेळी जेवण देण्यास विलंब झाला म्हणून नवरदेवाने आणि त्याच्या घरच्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आम्ही त्यांना दीड लाख रुपये हुंडा त्याच दिवशी त्यांच्या घरी पाठवला होता. या लग्नासाठी आम्ही सात लाख रुपये खर्च केले. आमचे सात लाखाचे नुकसान झाले आहे. लग्नात येऊन आमच्या मुलीशी लग्न केलं नाही. त्यामुळे नवरदेवासह काही लोकांवर एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली होती.
त्यानंतर एसपीच्या आदेशानंतर नवरदेवाच्या घरच्यांनाही बोलावलं. तसेच गावातील काही लोकांनाही बोलावण्यात आलं. त्यानंतर पोलीस ठाण्यात काही तास वादावादीच सुरू होती. शेवटी दोन्ही कुटुंबांमध्ये समझौता झाला. नवरीच्या घरच्यांना नवरदेवाने भरपाई म्हणून 1.61 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि तोडगा निघाला. त्यामुळे नवरदेवाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला नाही.