कुठे लपली निकिता सिंघानिया? बेंगळुरू पोलिसांचा कसा चुकवणार ससेमिरा, या चार लोकांकडे चौकशी
Atul Subhash-Nikita Singhania Case : अतुल सुभाष आत्महत्याप्रकरणात त्याची पत्नी निकीता हिचा ठावठिकाणा कुठे आहे, याची शोधाशोध पोलीस करत आहे. अतुल याने व्हिडिओत त्याच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला आहे. प्रकरणात निकीताचा भाऊ, आई आणि काका सध्या फरार आहेत.
AI सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष याच्या आत्महत्येप्रकरणात बंगळुरू पोलिसांनी आरोपींची शोध मोहिम सुरू केली आहे. त्याची निकीता, निकीताचा भाऊ, आई आणि काका सध्या फरार आहेत. त्यांना अटक करण्यासाठी बेंगळुरू पोलीस उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे दाखल झाले. तेव्हा त्यांना आई आणि भाऊ हे दोघे रात्रीच फरार झाल्याचे समजले. तर निकीताचा काका सुद्धा फरार असल्याचे लक्षात आले. तर निकीता कुठे आहे याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
निकीता दिल्लीत?
बेंगळुरू पोलीस दाखल होण्यापूर्वीच चारही आरोपींनी त्यांचा ठावठिकाणा शोधून ठेवला. पोलीस दाखल होण्यापूर्वीच ते पळाले. दरम्यान पोलिसांनी निकीता कुठे लपली आहे, याचा पत्ता लागल्याची माहिती समोर आली आहे. निकीता ही दिल्लीत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस आता या चारही आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत आहे. या चौघांच्या चौकशीत या आत्महत्येमागील दुसरी बाजू समोर येईल.
निकीता बड्या कंपनीत कामाला
प्राप्त माहितीनुसार, निकीता दिल्ली येथील असेंचर या कंपनीत काम करत आहे. अतुल याने आत्महत्या केली त्यावेळी ती दिल्लीतच होती. पण अतुलच्या आत्महत्येनंतर ती दिल्लीतून गायब झाल्याची माहिती समोर येत होती. ती दिल्लीतच असल्याची नवीन माहिती समोर येत आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. निकीताची आई, तिचा भाऊ अनुराग सिंघानिया आणि काका सुनील सिंघानिया हे सध्या फरार आहेत.
निकीताचे घर जौनपूर येथील कोतवाली परिसरातील खोवा मंडी या परिसरात आहे. जेव्हा पोलीस तिच्या घरी पोहचले. तेव्हा घराला कुलूप लागलेले होते. आरोपी निशा सिंघानिया आणि अनुराग सिंघानिया हे घरातून बाहेर पडताना सीसीटीव्हीत दिसत आहेत.
अतुल सुभाषच्या आत्महत्येने खबळबळ
सोमवारी 34 वर्षांचा अभियंता अतुल सुभाष याने बेंगळुरू येथील त्याच्या सदनिकेत आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी 24 पानी सूसाईड नोट लिहिली आणि 81 मिनिटांचा एक व्हिडिओ तयार केला. त्यात अतुलने पत्नी निकीता, सासू निशा, मेव्हणा अनुराग आणि निकीताचा काका सुनील यांच्यावर गंभीर आरोप लावले. कोर्टातील पेशकारापासून ते न्यायाधीशापर्यंत लाचखोरीचा आरोप केला. या घटनेनंतर अतुलच्या भावाच्या तक्रारीनंतर निकीता सिंघानिया, तिची आई, भाऊ आणि काका यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवारी घराच्या बालकनीतून निशा आणि अनुराग यांनी त्यांची बाजू मांडली. आम्ही कोणाला काहीच स्पष्टीकरण देणार नाही. आम्ही जे काय सांगायचे ते कोर्टात सांगू असे त्या म्हणाल्या होत्या. तेव्हा पोलिसांना त्यांच्यावर जास्त शक झाला. त्याच दिवशी रात्री हे कुटुंब फरार झाले.