शिक्षण MA, LLB! म्हणाली, भगवान कृष्ण माझ्या स्वप्नात आले, त्यांनीच मला… घरच्यांनाही शेवटी ऐकावच लागलं!
Unique marriage | उत्तर प्रदेशातल्या एका मुलीने भगवान कृष्णाशीच लग्न करायचा हट्ट धरला. तिची भक्ती आणि निश्चय पाहून अखेर घरच्यांनीही तिचं थाटामाटात लग्न लावून दिलं.
लखनौ | उत्तर प्रदेशातल्या (Uttar pradesh) ओरैय्या जिल्ह्यातली. एक तरुणी. शिक्षण चांगलंच. एम ए. एलएलबी (LLB). वय 30 वर्षे. नाव रक्षा. घरात लग्नाचा विषय सुरु झाला. रक्षाने हट्टच केला. मला लग्न करायचंय तर कृष्णाशी. रक्षाची लहानपणापासूनच कृष्णावर नितांत श्रद्धा. कृष्णाच्या भक्तीत ती तासन् तास रमून जायची. पण आयुष्याच्या एवढ्या मोठ्या प्रसंगातही तिचं कृष्णप्रेम टिकून राहिल, असं कुणाला वाटलं नव्हतं. मला लग्न करायचं तर कृष्णाशीच. कृष्ण भगवान माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनी स्वतःहून माझ्या गळ्यात वरमाला घातली. मग काय घरच्यांनाही तिचा हट्ट पुरवावा लागला. माध्यमांतील वृत्तांनुसार, सदर कुटुंबात मग कृष्णाला विधिवत जावई करून घेण्यात आलं. उत्तर प्रदेशात सध्या या लग्नाची जोरदार चर्चा आहे.
कुठे झालं हे लग्न?
ही घटना आहे उत्तर प्रदेशातील बिधूना जिल्ह्यातील औरैया येथील. एमचं शिक्षण घेतल्यानंतर ३० वर्षांची रक्षा सध्या एलएलबी करतेय. रक्षाला लहानपणापासूनच कृष्णभक्तीचं वेड आहे. नेहमीच कृष्णभक्तीत तल्लीन झालेल्या रक्षाच्या आई वडिलांनी तिच्या लग्नासाठी वरसंशोधन सुरु केलं. पण रक्षाने नेहमीच लग्नासाठी नकार दिला. एक दिवस तिने सांगितलं, कृष्ण भगवान तिच्या स्वप्नात आले होते. त्यांनी तिच्या गळ्यात वरमाला घातली.तेव्हापासून कृष्ण हेच माझे पती असल्याचा तिने निर्धार केला. मुलीच्या या हट्टापुढे आई-वडिलांनीही अखेर हार मानली.
मथुरेशी नातं, जावई कृष्ण
घरच्यांची परवानगी मिळताच रक्षाने हिंदू विधीनुसार, भागवान कृष्णासोबत लग्नाला होकार दिला. मेंदी, हळद, बांगड्या सगळे विधी पार पडले. लग्नाचा मंडपही सजला. या लग्नामुळे रक्षा खूप खुश आहे. लेकीचा आनंद पाहून आई-वडिलांनीही त्यातच आनंद शोधलाय. आता भगवान श्रीकृष्ण आमचे जावई बनून घरात विराजमान होतील, आम्ही खुश आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे. तर रक्षाच्या मोठ्या बहिणीनेही यावरून समाधान व्यक्त केलंय. आता मथुरेशी आमचं नवं नातं तयार झाल्याचं ती म्हणाली.