Uttarakhand CM : उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा पुष्कर सिंह धामी, पराभवानंतरही भाजपकडून पुन्हा संधी!
उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. देहरादून इथं विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. त्यानंतर पर्यवेक्षक केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उपपर्यवेक्षक मीनाक्षी लेखी यांनी पुष्कर सिंह धामी यांच्या नावाची घोषणा केलीय.
मुंबई : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत (Uttarakhand Assembly Election) भाजपनं मोठा विजय मिळवल्यानंतर उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. देहरादून इथं विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. त्यानंतर पर्यवेक्षक केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि उपपर्यवेक्षक मीनाक्षी लेखी यांनी पुष्कर सिंह धामी यांच्या नावाची घोषणा केलीय. दरम्यान, उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुष्कर सिंह धामी, सतपाल महाराज, माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक, खासदार अनिल बलूनी यांची नाव चर्चेत होती. मात्र, पुष्कर सिंह धामी या शर्यतीत अग्रभागी राहिले आणि राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाची माळ धामी यांच्या गळ्यात घातली. तर 23 मार्च रोजी शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचीही माहिती मिळतेय. महत्वाची बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीत धामी यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. असं असलं तरी भाजपकडून पुन्हा एकदा त्यांनाच संधी देण्यात आलीय.
धामी यांनी 6 महिन्यात वेगळी छाप सोडली- राजनाथ सिंह
उत्तराखंडमध्ये भाजपकडून चार वेळा मुख्यमंत्री बदलण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधीच पुष्कर सिंह धामी हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी पुष्कर सिंह धामी यांच्या नावाची घोषणा करताना राजनाथ सिंह म्हणाले की, उत्तराखंडमध्ये 6 महिन्याच्या कार्यकाळात मुख्यमंत्रीपदाच्या रुपात धामी यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर ते राज्याचा अधिक विकास करतील.
विधिमंडळ नेतेपदी धामी यांची निवड
Pushkar Singh Dhami announced as the leader of the Uttarakhand Bharatiya Janata Party Legislature Party.
(File Pic) pic.twitter.com/oh7KVRuPBo
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 21, 2022
…आणि धामी यांच्या नावाची घोषणा
दरम्यान, निवडणूक निकालानंतर उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार याबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी याबाबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नव्या सरकारच्या स्थापनेबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्रीपदासाठी पुष्कर सिंह धामी यांच्या नावाची घोषणा केलीय.
पराभवानंतरही धामी यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रीपदाची धुरा
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदी असलेल्या पुष्कर सिंह धामी यांना पराभवाची चव चाखावी लागली. काँग्रेसच्या भुवन कापडी यांनी धामी यांचा पराभव केला. महत्वाची बाब म्हणजे तब्बल 5 हजार मतांनी धामी यांना पराभव पक्तरावा लागला आहे. अशा स्थितीत भाजपने मुख्यमंत्रीपदाची माळ धामी यांच्याच गळ्यात घातलीय. त्यामुळे आता धामी यांच्यासाठी भाजपकडून एखाद्या आमदाराचा राजीनामा घेतला जाऊ शकतो आणि त्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत धामी यांना विजयी होणं महत्वाचं आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपनं 70 पैकी 47 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं. भाजपला जोरदार टक्कर देण्याची शक्यता असलेल्या काँग्रेसला केवळ 19 जागांवर समाधान मानावं लागलं. तर बहुजन समाज पक्षाला आणि अपक्षांना प्रत्येकी 2 जागा मिळाल्या आहेत.
कोण आहेत धामी?
पुष्करसिंह धामी हे उत्तराखंडमध्ये भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्षही होते. 2002 ते 2008 पर्यंत त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. धामी यांचा जन्म टुंडी, पिथौरागड येथे झाला होता. त्यांनी पदव्युत्तर पदवी आणि वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. त्यांना तीन बहिणी आहेत. त्यांचे वडील माजी सैनिक होते. उत्तराखंडमधील खटीमा विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा विजयी झाले आहेत. 2012 ते 2017 पर्यंत ते आमदार होते. 2017च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. अवघ्या दुसऱ्या टर्ममध्येच त्यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. त्यांनी 1990 ते 1999पर्यंत एबीव्हीपीमध्ये अनेक पदांवर काम केलं आहे. भाजयुमोच्या अध्यक्षपदी असताना सहा वर्ष राज्यात फिरून बेरोजगार तरुणांचं संघटन उभारल्याचा धामी यांचा दावा आहे. सहा महिन्यापूर्वी भाजपनं त्यांना उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती.
इतर बातम्या :