बोगद्यातील 41 मजूरांच्या सुटकेसाठी आता ‘व्हर्टीकल ड्रीलिंग’, नागपूरहून कोल इंडीयाची टीम दाखल
चारधाम यात्रेसाठी ऑल सिझन रोड तयार करताना उत्तराखंड येथील उत्तरकाशीच्या सिलक्यारा येथे ऐन दिवाळीत बोगद्यात भूस्खलन होऊन 41 मजूर अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी गेले पंधरा दिवस प्रयत्न सुरु आहेत. ऑगर ड्रीलींग मशिन वारंवार बंद पडत असल्याने आता दोन ते मार्गांनी मजूरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. डोंगराच्या वरच्या बाजूने ड्रीलिंग सुरु करण्यात आले आहे. नागपूरच्या कोल इंडीयाची टीम येथे दाखल झाली आहे. मजूर सुरक्षित असून त्यांना बाहेर काढायला आणखी काही दिवस लागणार आहेत.
उत्तराखंड | 26 नोव्हेंबर 2023 : उत्तराखंडातील उत्तरकाशीत ऐन दिवाळीत झालेल्या भूस्खलनाने बोगद्यात पंधरवड्यापासून अडकलेल्या 41 मजूरांची सुटका लांबली आहे. या मजूरांना बाहेर काढण्यासाठी आणलेल्या ऑगर मशिनने देखील कुचकामी ठरत आहेत. रेस्क्यू टीमला त्यामुळे थांबून थांबू अंदाज घेत काम करावे लागत आहे. देशातील अन्य भागातून पाठविलेली यंत्रसामुग्री रस्ते मार्गाने सिलक्यारा येथे पोहचण्यास पावसामुळे प्रचंड विलंब होत आहे. त्यामुळे आता आडव्या मार्गाने आता पाईप टाकण्यास अडथळे निर्माण होत आहेत. म्हणून उभ्या मार्गाने डोंगरावरुन व्हर्टीकल ड्रीलिंगही सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे मजूरांना बाहेर आणखी काही दिवस लागतील असे म्हटले जात आहे.
चारधाम यात्रेसाठी बारमाही रस्ता बनविण्याच्या योजनेतील सिलक्यारा बोगद्यात 41 मजूर पंधरवड्यापासून जीवन मरणाशी संघर्ष करीत आहे. या मजूरांना काढण्यासाठी हरतऱ्हेने केलेले प्रयत्न विफल ठरत आहेत. ड्रीलिंग मशीन वारंवार बंद पडत आहे. त्यातल्या त्या मजूरांची प्रकृती ठीक असून त्यांना वेळोवेळी जेवण इतर वस्तू पुरविल्या जात आहेत ही दिलाशाची बाब आहे. मजूरांना बाहेर काढण्यासाठी व्हर्टीकल ड्रीलिंग देखील केली जात आहे. यासाठी दोन जागा निवडल्या आहेत. दोन्ही जागा उंचावर बोगद्याच्या किनारी भागात आहेत. 15 व्या दिवशी डोंगराच्या वरच्या भागात ड्रीलिंग सुरु केले आहे. व्हर्टीकल ड्रीलिंग 15 मीटर आतपपर्यंत गेली आहे. आणखी चार दिवस त्यासाठी लागणार आहे.
दुसरीकडे ऑगर मशिनच्या अडकलेल्या पात्याच्या भागाला आता कापण्यासाठी प्लाझ्मा कटरचा वापर केला जात आहे. उद्यापर्यंत हे काम पूर्ण होईल. तसेच इतर भागात मॅन्युअल पद्धतीने खोदकाम सुरु केले आहे. भारतीय सैन्याला पाचारण करुन हे काम त्यांना दिले आहे. आर्मी ड्रिफ्ट टनेलचे काम दरड कोसळल्याच्या ठिकाणाच्या बोगद्याच्या डाव्या बाजूने सुरु केले आहे. ऑगर मशिनच्या अडकलेल्या पात्यांना कापावे लागणार आहे. सोमवारी सकाळपासून मॅन्युअल एस्केप टनल बनविण्याचे काम सुरु होणार आहे.
नागपूरहून कोल इंडीयाची टीम दाखल
मजूरांच्या सुटकेसाठी व्हर्टीकल खोदकाम सरु झाल्याने त्यासाठी कोल इंडीया लिमिटेडची नागपूरची टीम सिलक्यारा येथे दाखल झाली आहे. ही टीम मजूरांच्या व्हीर्टीकल खोदकामासाठी मदत करणार आहे. व्हर्टीकल ड्रीलिंगनंतर मजूरांना वरुन बाहेर काढण्याच्या कॅप्सुलचे काम नागपूरवरुन आलेली कोल इंडीयाची टीम करणार आहे. या टीममध्ये चार तंत्रज्ञांचा समावेश आहे.