राजस्थान : भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या सेमी हायस्पीड आलिशान वंदेभारत एक्सप्रेसच्या वेग प्रचंड असल्याने सुरूवातीपासून या गाडीच्या चर्चापेक्षा या गाडीने किती मोकाट गुरांना धडक दिली याच्याच बातम्या चर्चेत आल्या होत्या. आता राजस्थानच्या अलवार येथे बुधवारी वंदेभारत एक्सप्रेसने धडक दिल्याने गाय हवेत उडून ट्रॅकच्या शेजारी विधीस बसलेल्या व्यक्तीच्या अंगावर तिचे धूड पडून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील अरावली विहार पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरधाव वंदेभारत एक्सप्रेसने गायीला हवेत उडविल्याने तिच्या शरीराचा भाग वेगाने ट्रॅकपासून 30 मीटर अंतरावर विधीस बसलेल्या शिवदयाल शर्मा यांच्या अंगावर कोसळला. त्यात शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. शर्मा हे रेल्वेतून 23 वर्षांपूर्वी वायरमन पदावरून रिटायर झाले आहे. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.
शिवदयाल यांच्या नातेवाईकाने सांगितले की वंदेभारत एक्सप्रेस काली मोरी गेट येथून सकाळी साडे आठच्या सुमारास वेगाने जात असताना एक गाय ट्रॅकच्या दिशेने जात असताना ट्रेनचा फटका या गायीला प्रचंड वेगात बसला. त्यामुळे गायीचा शरीराचा एक भाग वेगाने उडून 30 मीटर अंतरावर विधीस बसलेल्या शिवदयाल यांच्या अंगावर पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. शिवदयाल यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासनीसाठी पाठविण्यात आला आहे.
ट्रॅकच्या शेजारी पोलादी कुंपण
वंदेभारतच्या उद्घाटनापासून तिची गुरांशी धडक झाल्याच्या अनेक घटना मागे घडल्या आहेत. यामुळे या गाडीचा पुढील एअरो डायनामिक कोन असलेला फायबरचा भाग चेपून तो क्षतिग्रस्त झाल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद वंदेभारतच्या पहिल्याच फेरीला 6 ऑक्टोबर रोजी गुरांची धडक झाल्याने वंदेभारतच्या इंजिना समोरचे फायबरचे कव्हर चेपले होते. दुसऱ्याच दिवशी आणंद स्थानकानजिक याच ट्रेनची पुन्हा गुरांशी धडक झाली होती.
वंदेभारतचा वेग 130 ते 160 किमी प्रति तास असल्याने तिला सुरूवातीपासून मोकाट गुरांचा धोका निर्माण झाला आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदेभारतने धडक दिल्याने गुरांचा मृत्यू झाल्याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर रेल्वे ट्रॅकच्या शेजारी पोलादी कुंपण बसविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.