Gyanvapi Case: ज्ञानवापी मशिदीबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळत आता दिले असे आदेश
ज्ञानवापी मशिद आणि काशी विश्वानाथ मंदिर प्रकरणावर वाराणसी जिल्हा कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे बऱ्याच गोष्टी येत्या काळात उघड होण्याची शक्यता आहे.
वाराणसी : ज्ञानवापी-काशी विश्वनाथ प्रकरण गेल्या काही दिवसांपासून कोर्टात आहे. या प्रकरणावर आता वाराणसी कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने मुस्लिम पक्षाची याचिक फेटाळत एएसआय सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने आपल्या निर्णयात सांगितलं आहे की, “एएसआय सर्व्हेदरम्यान परिसरात नमाज होत राही.” तसेच सर्व्हेचं काम तीन ते सहा महिन्यांच्या आत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. पण कोर्टाच्या या निर्णयानंतर मुस्लिम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुस्लिम पक्षाने सांगितलं आहे की, “न्यायालयाच्या या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ.”
हिंदू पक्षाच्या वकिलांनी काय सांगितलं?
हिंदू पक्षाची कोर्टात बाजू मांडणाऱ्या वकील विष्णु शंकर यांनी सांगितलं की, “कोर्टाने वजू टँक परिसर सोडून ज्ञानवापी परिसराचा एएसआय सर्व्हे करण्यास सांगितलं आहे. वजू टँक सध्या सील करण्यात आला आहे. मला वाटतं सर्व्हे तीन ते सहा महिन्यात पूर्ण होईल.” दुसरीकडे हिंदू पक्षाच्या बाजून उभे असलेल्या वकील सुभाष नंदन यांनी सांगितलं की, “एएसआय सर्व्हे करण्याची याचिका स्वीकारली गेली आहे. या प्रकरणाचा हा टर्निंग प्वॉइंट असेल.”
#WATCH | Varanasi, UP: Advocate Subhash Nandan Chaturvedi, representing Hindu side in the Gyanvapi case, says, "Our application for the ASI survey has been accepted. It's a turning point in the case." pic.twitter.com/8C9j72Eh2B
— ANI (@ANI) July 21, 2023
मुस्लिम पक्षाने कसा केला होता युक्तिवाद
या प्रकरणी यापूर्वी 12 आणि 14 जुलैला सुनावणी झाली होती. तेव्हा मुस्लिम पक्षाच्या वकिलांनी सर्व्हेक्षण करण्यास विरोध केला होता. “ज्ञानवापी परिसराचं पुरातत्व सर्व्हेक्षण केलं तर मूळ स्ट्रक्चरचं नुकसान होऊ शकते. त्यामुळे या परिसरात सर्व्हे करू नका. हिंदू पक्षाकडून पुरावे जमा केले जात आहेत ते कायदेशीर नाहीत.” असा युक्तिवादही मुस्लिम पक्षाकडून केला गेला.
हिंदू पक्षाने आपली बाजू कशी मांडली?
हिंदू पक्षाने कोर्टात आपली बाजू मांडताना सांगितलं होतं की, “ज्ञानवापी परिसराचं सर्व्हेक्षण करणं आवश्यक आहे. यामुळे खरी बाजू उघड होईल. तसेच ज्ञानवापी प्रकरणाचा तणाव सामंजस्यपणे सोडवणं गरजेचं आहे. ज्ञानवापी परिसराचं वैज्ञानिक तथ्य समोर येणं गरजेचं आहे.”