Vice President Election 2022 : उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून व्यंकया नायडूंना पुन्हा संधी नाही, मुख्तार अब्बास नक्वींचं नाव निश्चित
भाजपकडून नायडू यांना पुन्हा संधी देण्यात येणार नसल्याची माहिती मिळतेय. भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठी मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांचं नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी पाठोपाठ आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणुकही (Vice Presidential Election) जाहीर झालीय. 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. 19 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. एएनआय वृत्तसंस्थेकडून तशी माहिती देण्यात आलीय. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे. भाजपकडून नायडू यांचा पुन्हा एकदा उपराष्ट्रपतीपदाची संधी दिली जाणार का? अशी चर्चा सुरु होती. मात्र, भाजपकडून नायडू यांना पुन्हा संधी देण्यात येणार नसल्याची माहिती मिळतेय. भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठी मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांचं नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मुख्तार अब्बास नक्वी यांची राजकीय कारकिर्द
मुख्तार अब्बास नक्वी हे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिले आहेत. सध्या त्यांच्यावर केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्रालयाचा कार्यभार आहे. नव्की यांचा जन्म अलाहाबादचा आहे. त्यांनी आपलं शिक्षण अलहाबाद विश्वविद्यालयातून पूर्ण केलं. आणीबाणीच्या काळात त्यांनी कारावासही भोगला. नक्वी हे कधीकाळी इंदिरा गांधी यांचा पराभूत करणारे समाजवादी नेता राजनारायण यांच्या जवळचे होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
मुख्तार अब्बास नक्वी यांनी आतापर्यंत भाजपच्या तिकीटावर दोन वेळा विधानसभा आणि तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. तसंच तीन वेळा ते भाजपकडून राज्यसभा सदस्यही राहिले आहेत. 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय माहिती प्रसारण आणि संसदीय कामकाज मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला होता.
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. निवडणुकीवेळी राज्यसभेचे महासचिव हे राष्ट्रपती निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तर लोकसभेचे महासचिव हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. संसदेतच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे.
देशात 1952 मध्ये पहिल्यांदा उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली होती. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती झाले. उपराष्ट्रपती म्हणून दोन टर्म त्यांचा कार्यकाळ राहिला. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळही 5 वर्षांसाठी असतो. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त होतं.
उपराष्ट्रपतीपदाला अनन्य साधारण महत्व
भारतात उपराष्ट्रपती राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. संविधानामधील 63व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग किंवा अन्य कारणांमुळे राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतात. तसंच संसदेच्या राज्यसभा सदनाचा अध्यक्ष ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतींवर आहे.