Manipur : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, दहशतवाद्यांचा ड्रोनने बॉम्ब हल्ला, दोघांचा मृत्यू तर 9 जखमी
रविवारी दुपारी दोनच्या सुमारास सशस्त्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.जोरदार गोळीबारामुळे अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.
वर्षभरापासून हिंसाचाराने होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये कायम तणावाचं वातावरण पहायला मिळतं. हिंसाचारात अनेक नागरिकांनी जीवही गमावला. लष्कराला पाचारण केल्यावर तेथील परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच आता राज्यात पुन्हा हिंसाचाराचं वातावरण उसळलं आहे. मणिपूरमधील पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात हिंसाचार झाल्याची माहिती मिळत आहे. गोळीबाराने मणिपूर पुन्हा हादरलंय. गावात कुकी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. अंदाधुंद गोळीबार आणि ड्रोनने बॉम्ब हल्ला केला असून अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दहशत मजाली आणि जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ झाली. या दुर्दैवी हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत.
इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कौत्रुक परिसरात कथित कुकी अतिरेक्यांनी हल्ला केला. कोत्रुक गावच्या पंचायत अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास सशस्त्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावेळी गावातील स्वयंसेवक संवेदनशील भागात नव्हते. अतिरेक्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारामुळे अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. गोळीबार आणि बॉम्बस्फोट सुरू झाले तेव्हा गावकरी आपापल्या घरात होते. गावातील स्वयंसेवकांना परिसरातून परत बोलावल्यानंतर अवघ्या 10 दिवसांनी हा हल्ला झाला. राज्य सुरक्षा दलाच्या सल्ल्यानुसार आम्ही आमच्या गावातून स्वयंसेवकांना माघारी घेतले. आमच्यातील एका महिलेचा गोळी लागून मृत्यू झाला आणि तिची मुलगी जखमी झाली, असे स्थानिकांनी सांगितलं.
त्यानंतर गोळीबार झालेल्या कौत्रुक या गावात तणावपूर्ण वातावरण आहे. गावातील अनेक घरांना आगही लावण्यात आली. त्यानंतर अनेक स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
हल्ल्यामुळे नागरिक संतापले
मात्र या हल्ल्यामुळे कौत्रुक गावातील लोकांनी निराशा व्यक्त केली आहे. राज्य सरकारने शांतता प्रस्थापित करण्याबाबत अनेक आश्वासने देऊनही आम्ही सुरक्षित नाही, असे अनेकांच म्हणणं आहे. राज्य सरकार वारंवार दावा करतं की शांतता पूर्ववत झाली आहे, परंतु आम्ही अजूनही हल्ल्यांच्या भीतीने जगत आहोत. खरोखर सुरक्षित कधी होणार? असा सवाल स्थानिक महिला देखरेख गटाच्या सदस्या निंगथौजम तोमाले यांनी विचारला.
इंफाळ पश्चिम जिल्ह्यात कर्फ्यू
स्थानिक प्रशासनाने इंफाळ पश्चिम जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. मणिपूर सरकारने या हल्ल्याचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
हाय टेक ड्रोनने हल्ला
या हल्ल्याबाबत मणिपूर पोलिसांनी दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. कुकी अतिरेक्यांनी हायटेक ड्रोनचा वापर केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अशा ड्रोनचा वापर फक्त युद्धातच होतो. या ड्रोनद्वारे हल्ला करण्यासाठी उच्च प्रशिक्षित आणि तांत्रिक तज्ञ असणे आवश्यक आहे. या संपूर्ण घटनेत मोठे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही,असा दावा पोलिसांनी केलाय.