West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जींना बसणाऱ्या धक्क्यांची मालिका सुरुच, ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक आमदार भाजपात
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बसणाऱ्या धक्क्यांची मालिका सुरुच आहे. सोमवारी तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशावेळी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बसणाऱ्या धक्क्यांची मालिका सुरुच आहे. सोमवारी तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी यांची सत्ता उखडून टाकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपकडून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची ‘महाभरती’ केली जात आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनीही भाजपला कडवी झुंज देण्याची तयारी ठेवल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.(Disgruntled MLAs in Trinamool Congress join BJP)
तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे मालदा जिल्हा परिषदेवर आता भाजपचा कब्जा झाला आहे. सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये सिंगूरचे आमदार रविंद्रनाथ भट्टाचार्य, हबीबपूरचे सरला मुर्मु, फुलबॉलर दिपेंदु विश्वास, आमदार सोनाली गुहा, आमदार जुटू लाहिडी, आमदार शितल सरदार, अभिनेत्री तनुश्री चक्रवर्ती यांच्यासह मालना जिल्हा परिषदेच्या अनेक सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे उपाध्यक्ष मुकुल रॉय, बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि शुभेंदु अधिकारी उपस्थित होते.
तृणमूलमधील नाराजांच्या हाती ‘कमळ’
तृणमूलच्या रविंद्रनाथ भट्टाचार्य यांना यावेळी तिकीट देण्यात आलेलं नाही. त्यांच्या ऐवजी बेचाराम मन्ना यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशाच प्रकारे दिपेंदु विश्वास हे बशीरहाटचे आमदार होते. मात्र, त्यांनाही तृणमूलकडून तिकीट नाकारण्यात आलं. दुसरीकडे सोरेन मुर्मु यांना मालदा हबीबपूरमधून TMCने उमेदवारी दिली होती. पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याप्रमाणे सोनाली गुहा, जुटू लाहिडी यांना TNCकडून उमेदवारी देण्यात आलेली नाही. उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे हे सर्वजण नाराज होते. त्यामुळे त्यांनी TMCला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपची सत्ता आल्यास बंगालचा चेहरामोहराच बदलू – पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानातून विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये अस्सल परिवर्तन करुन दाखवू. स्वातंत्र्यानंतर बंगालकडून जे जे हिसकावले गेले आहे, ते ते परत मिळवून देऊ. तसेच ‘सिटी ऑफ जॉय’ अशी ओळख असलेल्या पश्चिम बंगालला ‘सिटी ऑफ फ्युचर’ बनवू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालच्या जनतेला दिले.
“मला पश्चिम बंगालला येण्याचे मला भाग्य लाभले. या मैदानाने अनेक देशभक्त पाहिले आहेत. तसेच या मैदानाने बंगालच्या जनतेला वेठीस धरणारे लोकसुद्धा पाहिली आहेत. बंगालच्या जनतेने परिवर्तनाची आस सोडली नाही. येथील जनतेने परिवर्तनासाठी ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र, त्यांनी देशाचा विश्वासघात केला,” असे मोदी यावेळी म्हणाले.
संबंधित बातम्या :
ममतांच्या जीवावर संसदेत पोहचणारे मिथून चक्रवर्ती भाजपात कसे? काय आहे गुपित?
Disgruntled MLAs in Trinamool Congress join BJP