कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बांकुडातील मेजिया इथं आयोजित प्रचारसभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी अमित शाहांवर जोरदार टीका केली. कोलकाता इथं बसून नोकरशाह विरोधात कट रचला जात आहे. गृहसचिवांना नोटीस पाठवली जातेय. तर अनेक उद्योगपतींवर छापेमारी सुरु असल्याचा आरोप ममता यांनी केलाय.(Mamata Banerjee criticizes Amit Shah)
पश्चिम बंगालच्या जनतेला माहिती आहे की, ते ममता बॅनर्जी यांना रोखू शकत नाहीत. अशावेळी कोलकाता इथं बसून गृहमंत्री कट रचत आहेत. गृहसचिवांना नोटीस पाठवली जात आहे. निवडणूक काळात त्यांना का परेशान केलं जात आहे? सर्वांना बंद करता येईल, असं अमित शाह यांना वाटतंय का? निवडणूक आयोग कोण चालवतंय? अमित शाह तर चालवत नाहीत ना? असे प्रश्न उपस्थित करत ममता बॅनर्जी यांनी अमित शाहांवर टीकेचा भडीमार केलाय.
इतकच नाही तर माझी हत्या करुन जिंकणार आहेत काय? आम्ही समाजात शांतता प्रस्थापित केली आहे. पण पैशावर मतं ते घेणार! याचा बदला घ्यावा लागेल. मतांमधूनच याचा बदला घ्यावा लागेल, असं सांगत विजयाचा विश्वासही ममता यांनी व्यक्त केला आहे.
निवडणूक आयोगाच्या कामात हस्तक्षेप सुरु असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. माझ्या सुरक्षा संचालकांना हटवण्यात आलं आहे. आता एवढे मंत्री कोलकाता इथं येऊन बसले आहेत. ते नैसर्गिक आपत्तींवेळी कुठे होते? बाहेरुन आणलेल्या गुंडांकडून निवडणूक होऊ देणार नाही. लूटमार करणाऱ्या भाजपला सरकार चालवू देणार नाही, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी एकप्रकारे भाजपला आव्हानच दिलं आहे.
नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान जखमी झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. व्हीलचेअरवर बसून त्यांनी आज प्रचार रॅलीत सहभाग घेतला. इतकच नाही तर जखमी वाघिण जास्त घातक असते, अशा शब्दात विरोधी भाजपला एकप्रकारे आव्हानच दिलं आहे. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप तृणमूळ काँग्रेसकडून करण्यात आला आहे. पण हा हल्ला नाही तर अपघात असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. यावेळीच ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली आहे.
जमखी अवस्थेतही ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारात उतरल्या आहेत. एका व्हीलचेअरवर बसून त्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. रॅलीत सहभागी झालेल्या ममता जनतेला हात जोडून अभिवादन करत होत्या. पश्चिम बंगालमध्ये 14 मार्च रोजी नंदीग्राम दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त मायो रोड ते हादरा मोड अशी 5 किलोमीटरची रॅली तृणमूल काँग्रेसकडून काढण्यात आली.
संबंधित बातम्या :
Special report : पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी खेळी, 4 खासदार मैदानात, काय आहे शाहनीती?
West Bengal Election : ममता बॅनर्जींनी शपथपत्रात गुन्हे लपवले? उमेदवारी रद्द करा, भाजप आक्रमक
Mamata Banerjee criticizes Amit Shah