बिहारमधील किशनगंज (Bihar Kishanganj) येथील सातवीच्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरून (Exam Paper) वादंग माजलाय. या प्रश्नावरून काश्मीर हा एक स्वतंत्र देश असल्याचं प्रतीत होतंय. परीक्षेतील एक प्रश्न असा होता- पुढील देशांतील लोकांना काय म्हणतात- त्यात चीन, नेपाळ, इंग्लंड, काश्मीर (Kashmir) आणि भारत असे उपप्रश्न देण्यात आले होते. काश्मीरला वेगळा देश म्हटल्याने राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. नितीश कुमारांच्या नेतृत्वातील बिहार सरकारला भाजपने चांगलंच घेरलंय.
बिहार भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल म्हणाले, काश्मीर हा भारताचा भाग नाही, अशीच जेडीयूची विचारधारा आहे. त्यांनी संपूर्ण सीमांचल भागातील हिंदी शाळा बंद करण्याचाही आरोप केलाय.
भाजपचे जिल्हाध्यक्ष सुशांत गोपे म्हणाले, बिहारमधील महाआघाडी सरकार नेहमीच तुष्टीकरणाचं राजकारण करतं. भारत आणि काश्मीर वेगवेगळे आहेत, असंच विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवण्याचे हे प्रयत्न आहेत. ही मानवी चूक नसून आगामी निवडणुकांपूर्वी नितीश कुमार यांनी आखलेलं राजकारण आहे, असा आरोप त्यांनी केलाय.
दरम्यान, शाळा प्रशासनाने म्हटलंय की हा पेपर बिहार शिक्षण मंडळाकडून सेट करण्यात आला होता. काश्मीरच्या लोकांना काय म्हटलं जातं, असं विचारायचं होतं पण मानवी चुकीमुळे वेगळा अर्थ निघतोय, असं स्पष्टीकरण देण्यात आलं.
Kishanganj, Bihar | Class 7 question paper terms Kashmir as separate country
Got this via Bihar Education Board. Ques had to ask what are people from Kashmir called? Mistakenly carried as what are people of country of Kashmir called? This was human error: Headteacher, SK Das pic.twitter.com/VVv1qAZ2sz
— ANI (@ANI) October 19, 2022
२०१७ मध्येदेखील अशाच प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता. AIMIM नेते शाहिद रब्बानी म्हणाले, चूक झाली असेल तर ती सुधारली पाहिजे. पण मुद्दाम चूक केली असेल तर कठोर कारवाई झाली पाहिजे. यात सरकारचा हात नाही. यावरून राजकारण करणे गैर आहे…’
भाजपाच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना जदयू नेते सुनिल सिंह म्हणाले, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. याबद्दल कुणाचंही दुमत नाही. पण भाजपने अनावश्यक राळ उठवली आहे.