बंगळुरु : चांद्रयान-3 ने बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. हा समस्त भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहेच. पण त्याचवेळी या यशस्वी सॉफ्ट लँडिंगचे सर्वसामान्यांसाठी सुद्धा अनेक फायदे आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने चंद्रावर चांद्रयान-3 पाठवलय. त्याचा मुख्य हेतू चंद्रावर पाण्याचा शोध घेणं हा आहे. चंद्रावर खनिज, धातू सापडण्याची देखील शक्यता आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरच्या माध्यमातून त्याबद्दल माहिती समजेलच. पण त्याशिवाय चांद्रयान-3 च्या मिशनचे इतरही फायदे आहेत.
इस्रो आपल्या किफायती कॉमर्शियल लॉन्चिंगसाठी ओळखली जाते. आतापर्यंत 34 देशांचे 424 उपग्रह इस्रोने प्रक्षेपित केले आहेत. इस्रोच्या नावावर एकाचवेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम आहे. चांद्रयान-1 न चंद्रावर पाणी शोधलं. चांद्रयान-2 चा ऑर्बिटर अजूनही कार्यरत आहे. त्यानेच चांद्रयान-3 साठी लँडिंग साइटचा शोध घेतला.
असा वाढणार बिझनेस
मंगळयानच यश सगळ्या जगाला माहित आहे. चांद्रयान-3 च्या यशाने मोठ्या अवकाश संशोधन संस्थांमध्ये इस्रोला मानाच स्थान मिळालं आहे. या यशस्वी मोहीमेमुळे जगातील अनेक देशांचा इस्रोकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आता अन्य देश आणखी जास्त संख्येने उपग्रह प्रक्षेपणासाठी भारताकडे देऊ शकतात.
चांद्रयान-2 च्या एका उपकरणाची लँडिंगमध्ये महत्त्वाची भूमिका
चांद्रयान आणि मंगळयान स्पेसक्राफ्टमध्ये बसवलेल्या पेलोड्स म्हणजे उपकरणांचा वापर नंतर हवामान आणि कम्युनिकेशन सॅट्लाइटसमध्ये होतो. संरक्षणासाठीच्या, नकाशा बनवणाऱ्या उपग्रहांमध्ये वापर होतो. चांद्रयान आणि मंगळयानासाठी जी टेक्नोलॉजी बनवण्यात आली, त्याचा उपयोग देशवासियांच्या हितासाठी करण्यात येतो. कम्युनिकेशन व्यवस्था विकसित करण्यासाठी मदत मिळते. देखरेख-लक्ष ठेवणं सोपं होतं. महत्त्वाच म्हणजे चांद्रयान-3 लँडिंगमध्ये चांद्रयान-2 च्या एका उपकरणाने महत्त्वाची भूमिका बजावली. ऑर्बिटरने लँडिंगची जागा कुठली असावी, या बद्दल माहिती दिली.
चांद्रभूमीवर लँडर, रोव्हरला सूर्याचा आधार
चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने आपलं मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर सुरु केलाय.
चंद्रावर 14 दिवस सकाळ आणि 14 दिवस रात्र असते.
23 ऑगस्टपासून चंद्रावर दिवस सुरु होणार होता. म्हणून आपण मिशनसाठी हाच दिवस निवडला.
पृथ्वीवरचे 14 दिवस म्हणजे चंद्रावरचा 1 दिवस असतो.
23 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत चंद्रावर सूर्यप्रकाश असेल, त्या मदतीने रोव्हर आणि लँडर चार्ज होईल.