WITT 2025: अत्तर गाईच्या दुधाप्रमाणे पिणार आहात का? भूपेंद्र यादव यांची अखिलेश यादव यांच्यावर टीका
या कार्यक्रमादरम्यान भूपेंद्र यादव यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी अखिलेश यादव गाईंसदर्भात केलेल्या विधानावर जोरदार टीका केली.

टीव्ही 9 न्यूज नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या विचारमंथन कार्यक्रमाचा आजचा दुसरा दिवस आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यानंतर आजच्या सत्रात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह भूपेंद्र यादव यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण नेत्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान भूपेंद्र यादव यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी अखिलेश यादव गाईंसदर्भात केलेल्या विधानावर जोरदार टीका केली.
जे स्वतःला लोहियाजींच्या विचारांचे वारसदार मानतात, ते म्हणतात की गाईमुळे दुर्गंधी येते आणि अत्तरामुळे सुगंध परसतो. मी त्यांना सवाल विचारतो की, तुम्ही अत्तर गाईच्या दुधाप्रमाणे पिणार आहात का? प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे महत्त्व असते. दोन्ही गोष्टी आपापल्या परिने आवश्यक आहेत. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात द्वेष वाढतो. त्यामुळे संतुलन राखणे गरजेचे आहे, असे भूपेंद्र यादव म्हणाले.
बिहारमध्ये सध्या विचारांची लढाई
भूपेंद्र यादव यांना बिहारमधील आगामी निवडणुका आणि जनता दल युनायटेड (जदयू) सोबतच्या संबंधांवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “बिहारमध्ये सध्या विचारांची लढाई सुरु आहे. एक असा विचार आहे की जो बिहारला पुन्हा भीती आणि दहशतीच्या वातावरणात पुन्हा घेऊन जाऊ इच्छितो. समाजात जातीय द्वेष निर्माण करू इच्छितो. राष्ट्रीय जनता दलाच्या एका नेत्याने कुंभाबद्दल विधान केले, परंतु भाजपाच्या कोणत्याही नेत्याने कधीही धर्माच्या आधारावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. आम्ही नेहमीच आमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम करतो. भाजपा युतीच्या धर्मावर विश्वास ठेवते. आमचा पक्ष आपल्या युतीतील सर्व दहा घटकांना सोबत घेऊन पुढे वाटचाल करतो.”
यावेळी भूपेंद्र यादव यांनी राहुल गांधींच्या आरोपावरही भाष्य केले. “राहुल गांधी यांनी संसदेत तब्बल ४५ मिनिटे भाषण केले आहे. त्यांची बहीण प्रियंका गांधीदेखील बोलल्या. ते संसदेतही बोलतात. बाहेरही आपले विचार व्यक्त करतात. मग त्यांचे माइक कोण बंद करत आहे?” असा सवाल भूपेंद्र यादव यांनी केला.
पक्ष ज्याला जी जबाबदारी देईल, ती त्याला मान्य असेल
यानंतर भूपेंद्र यादव यांना त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबद्दल आणि राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या संभाव्यतेबद्दल विचारण्यात आले. त्यावरही त्यांनी भाष्य केले. “पक्षाकडून जी जबाबदारी दिली जाईल, ती प्रत्येक कार्यकर्ता स्वीकारून काम करतो. आमच्या पक्षात एक लोकशाही प्रक्रिया आहे आणि पक्ष ज्याला जी जबाबदारी देईल, ती त्याला मान्य असेल” असे भूपेंद्र यादव म्हणाले.