महान गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्याकडून पंतप्रधान मोदींना कोणती प्रेरणा मिळाली?
प्रत्येक भारतीयाला महान गणितज्ज्ञ रामानुजन यांच्याबद्दल आदर आहे. मी पण रामानुजन यांचा खूप आदर करतो. त्यांच्यापासून मला खूप काही शिकायला मिळालं, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तब्बल तीन तासांचा पॉडकास्ट प्रसारित करण्यात आला आहे. प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आयुष्यात आलेले विविध प्रसंग सांगितले. त्या प्रसंगांचा आपण कसा सामना केला हे देखील त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना आपल्याला महान गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्यापासून प्रेरणा मिळाल्याचंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले मोदी?
प्रत्येक भारतीयाला महान गणितज्ज्ञ रामानुजन यांच्याबद्दल आदर आहे. मी पण रामानुजन यांचा खूप आदर करतो. त्यांच्यापासून मला खूप काही शिकायला मिळालं. सायन्स आणि अध्यात्मामध्ये फार मोठं कनेक्शन आहे. जर आपण कोणत्याही वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत मनाकडे पाहिलं तर ते आध्यात्मिकदृष्ट्या देखील प्रगत असतात.
श्रीनिवास रामानुजन म्हणायचे की या सर्व गणितीय कल्पना मला मी ज्या देवीची पूजा करतो, त्या देवीपासून मिळतात. तुमच्या डोक्यामध्ये त्या क्षेत्राशी संबंधित येणाऱ्या कल्पना ही एक प्रकारची तपश्चर्या आहे, ते हार्डवर्क नाही. तुम्ही जेव्हा एखाद्या कामासाठी स्वत:ला समर्पित करता तेव्हाच तुम्हाला त्याचा अपेक्षित परिणाम मिळतो. त्यासाठी तुम्ही जे काम करता त्या कामाशी एकरूप होण्याची तुम्हाला आवश्यकता असते. तुम्ही तुमच्या ज्ञानाचे जेवढे सोर्स ओपन कराल तेवढ्या जास्त आयडिया तुम्हाला मिळतील.
ज्ञान आणि माहिती यातील फरक समजणं गरजेचं
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, माहिती आणि ज्ञान यामध्ये फरक आहे. आज असे अनेक लोक आहेत ज्यांना माहिती आणि ज्ञान यातील फरक कळत नाही. ते माहितीलाच ज्ञान समजतात. मात्र तसं नाहीये. ज्ञान ही सतत सुरू असणारी एक प्रक्रिया आहे. तुम्हाला जर ज्ञान आणि माहिती यामधील फरक कळाला तरच तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. दरम्यान यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आयुष्यातील इतरही अनेक किस्से सांगितले आहेत.