कोविड व्हॅक्सिन आणि हार्ट अटॅकचा काय संबंध? ICMR चं नवीन संशोधन ‘या’ तीन प्रश्नांनी वाढवली चिंता
एप्रिल 2021 मध्ये भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली. सर्वसामान्य लोकांना व्हॅक्सिन देण्याची सुरुवात झाली. यादरम्यान देशभरात अनेक लोकांचा मृत्यू झाला. काही लोकांचा कोरोना व्हायरसमुळे तर काहींचा हार्ट अटॅक आणि काहींचा अन्य आजाराने मृत्यू झाला.
नवी दिल्ली : 2019 साली कोरोना व्हायरसने चीनमध्ये धुमाकुळ घातला. त्यानंतर कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात आपले हात पाय पसरवले. जानेवारी 2020 मध्ये पहिला रुग्ण सापडल्यावर भारतातील परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली. जगातील परिस्थिती पाहता भारतात लॉकडाऊन करण्यात आले. जगभरात कोरोना व्हायरसवर लस शोधण्यास सुरुवात झाली. 2021 च्या सुरवातीला भारतात दोन कंपन्यांना कोविड व्हॅक्सिन तयार करण्यात यश आले. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना व्हॅक्सिन देण्यात आली. आतापर्यंत भारतात 200 कोटीपेक्षा जास्त लसी देण्यात आल्या. मात्र, यासोबतच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एप्रिल 2021 मध्ये भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली. सर्वसामान्य लोकांना व्हॅक्सिन देण्याची सुरुवात झाली. यादरम्यान देशभरात अनेक लोकांचा मृत्यू झाला. काही लोकांचा कोरोना व्हायरसमुळे तर काहींचा हार्ट अटॅक आणि काहींचा अन्य आजाराने मृत्यू झाला. मृत्यूचे हे वाढते प्रमाण पाहून त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
वाढत्या हार्ट अटॅकवर ICMR च संशोधन
कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जी व्हॅक्सिन बनवण्यात आली होती त्यामुळेच हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप करण्यात येत होता. कोविड व्हॅक्सिन आणि तरुणांमध्ये वाढते हार्ट अटॅकचे प्रमाण यांच्यातील संबंधावर ICMR चे हे संशोधन आहे. त्या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी ICMR ने संशोधन सुरु केले होते. या संशोधनाचे काही रिपोर्ट येत्या जुलै महिन्यात प्रकाशित होणार आहे.
ठोस निष्कर्षावर पोहचल्यावरच रिपोर्ट होणार सार्वजनिक
ICMR च्या संशोधनाचे सुरुवातीचे रिपोर्ट राखून ठेवण्यात आले आहेत. हे रिपोर्ट प्रकाशित करण्यापुर्वी ICMR आतापर्यंत समोर आलेल्या सर्वच निष्कर्षांची समीक्षा करत आहे. या रिपोर्टचा सखोल अभ्यास कऱण्यात येत असून ICMR कोविड वॅक्सीन आणि हार्ट अटॅकच्या संबंधावर ठोस पुरावा मिळाल्यानंतरच हे रिपोर्ट सार्वजनिक करणार आहे.
कोणते आहेत ते तीन प्रश्न ?
– कोविड व्हॅक्सिन घेतल्यानंतर लोकांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे का?
– कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी बनवण्यात आलेली व्हॅक्सिन मृत्यूसाठी कारणीभूत आहे का?
– हार्ट अटॅकने मृत्यू झालेला रुग्ण कोरोना व्हायरसच्या कोणत्या स्टेजवर होता आणि केव्हापासून आजारी होता?
40 मोठ्या हॉस्पीटलमधून मिळवली माहिती
ICMR ने या संशोधनासाठी 40 हॉस्पीटलमधुन सॅम्पल गोळा केले आहेत. अनेक रुग्णांची माहिती एम्सकडून घेण्यात आली आहे. जवळजवळ 14,000 लोकांचे सॅम्पल गोळा करण्यात आले असून त्यातील 600 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
आरोग्यमंत्र्यांनी दिली होती कबूली
आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी कोरोनानंतर भारतात हार्ट अटॅकमुळे मृत्युमध्ये वाढ झाली आहे, असे एका काय्रक्रमत बोलताना मान्य केले होते. त्यावेळीच त्यांनी ICMR च्या या संशोधनाची माहिती दिली होती. भारताला या विनाशकारी प्रभावाचा सामना करावा लागणार आहे असे सुरुवातीला बोलले जात होते. पण, आता जागतिक स्तरावर भारताच्या लसीकरणाची प्रशंसा केली जात आहे. बिल गेट्स यांनीही भारताच्या लसीकरणाची प्रशंसा केली आहे असे त्यांनी सांगितले होते.
तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले
इंडियन हार्ट एसोसिएशननुसार मागच्या काही वर्षात 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण 50 टक्के तर 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये हे प्रमाण 25 टक्के पर्यंत इतके आहे. महिलांपेक्षा पुरुषामध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त असून हार्ट अटॅक येण्यामागे ब्लड प्रेशर, शुगर, ताण-तणाव, लठ्ठपणा आणि अनियमित जीवनशैली ही प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे.