मॉडेल तानिया सिंग हिच्या मृत्यूचे रहस्य काय? आयपीएल क्रिकेटरचे कनेक्शन? पोलिसांनी पाठवली नोटीस

| Updated on: Feb 22, 2024 | 7:29 PM

सुरतमधील फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडलेल्या मॉडेल तानिया सिंग हिच्या मृत्यूचे रहस्य काय? याचा तपास पोलीस घेत आहेत. एका आयपीएल क्रिकेटरसोबत तिचे ब्रेकअप झाले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयपीएल क्रिकेटरला नोटीस पाठविली आहे.

मॉडेल तानिया सिंग हिच्या मृत्यूचे रहस्य काय? आयपीएल क्रिकेटरचे कनेक्शन? पोलिसांनी पाठवली नोटीस
MODEL TANIYA
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

सुरत | 22 फेब्रुवारी 2024 : सुरत येथे रहाणारी 28 वर्षीय मॉडेल तानिया सिंग हिने सोमवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तानिया हिचे वडील रामेश्वर सिंह सकाळी उठले तेव्हा त्यांना तानिया पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी तत्काळ पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलीस तपासामध्ये तानिया हिच्या मृत्यूला अनपेक्षित असे वळण मिळाले आहे. पोलिसांनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटर अभिषेक शर्मा याला या प्रकरणावरून नोटीस पाठविली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त व्हीआर मल्होत्रा ​​यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, तानिया सिंग आणि सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्मा यांच्यात मैत्री होती असे पोलीस तपासात आढळून आले आहे. मृत मॉडेलने अभिषेक शर्मा यांना व्हॉट्सॲपवर एक मेसेज पाठवला होता. पण, तो मेसेज पाहिला गेला नाही. आमच्या तपासामधून आणखी काही अधिक तपशील कळतील. त्याचप्रमाणे अभिषेक शर्मा यांना नोटीस पाठविली आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

आयपीएल खेळाडू अभिषेक शर्मा आणि मॉडेल तानिया यांची जवळपास एक वर्षापासून मैत्री होती. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचे संबंध बिघडले होते. अभिषेक शर्मा हा तान्या हिच्यासोबत बोलत नव्हता. त्याने तिचा नंबरही ब्लॉक केला होता. सोशल मीडियावर तिने पाठविलेल्या मेसेजलाही तो प्रतिसाद देत नव्हता. आत्महत्येच्या दिवशीही तिने त्याला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला होता. पण त्याला उत्तर दिले गेले नाही.

तानिया ही एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करत होती. रविवारी रात्री उशिरा ती घरी परतली होती. पोलिसांनी तानिया हिचा फोन, सीडीआर आणि सोशल मीडियावरील पोस्ट तपासल्या आहेत. याचा अधिक तपास सुरु आहे. तानिया ज्यांच्या संपर्कात अनेकदा आली आहे त्या सर्वांची चौकशी केली जात आहे. त्याचप्रमाणे अभिषेक शर्मा यांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. त्या तपासात आणखी काही तथ्य समोर येईल अशा विश्वास सहाय्यक पोलीस आयुक्त व्हीआर मल्होत्रा यांनी व्यक्त केला.

कोण आहे तानिया सिंह?

28 वर्षीय तानिया ही राजस्थानमध्ये राहणारी मॉडेल होती. सध्या ती आपले वडील रामेश्वर सिंग यांच्यासोबत सुरतमधील वेसू स्टार गॅलेक्सीजवळील हॅप्पी एलिगन्स सेक्टर-बीमध्ये राहत होती. तान्याचे वडील गिरणीत काम करतात तर तिचा भाऊ कॅनडामध्ये राहतो. तानिया गेल्या दोन वर्षांपासून फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंगचे शिक्षण घेत होती.

वर्षभरापासून मित्र होते

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तानिया आणि आयपीएल क्रिकेटर अभिषेक या दोघांची जवळपास एक वर्षापूर्वी भेट झाली होती. त्यांची मैत्री झाली. त्यानंतर दोघांची काही वैयक्तिक छायाचित्रेही सोशल माध्यमावर पोस्ट केली होती. दोघांच्या वयात जवळपास पाच वर्षांचा फरक होता.