संभलच्या शाही जामा मशिदीत सर्व्हेदरम्यान काय आढळलं? काय पुरावे सापडले? जाणून घ्या
उत्तर प्रदेशातील संभल गेल्या काही दिवसांपासून धगधगतंय. अॅडव्होकेट कमिशनने केलेल्या सर्व्हेनंतर बरंच काही घडलं होतं. त्यानंतर एका पाठोपाठ एक घडामोडी घडत गेल्या. ऐतिहासिक विहिरी सापडल्याने हिंदू पक्षाकडून दावा आणखी पक्का केला गेला. आता या सर्व्हे रिपोर्टमधून एक मोठा खुलासा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
संभलच्या शाही जामा मशिदीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे हे प्रकरण कोर्टकचेरीत गेल्या काही दिवसांपासून गाजत होतं. असं असताना कोर्टाच्या आदेशानंतर अॅडव्होकेट कमिशनला सर्व्हे करण्याची परवानगी देण्यात आली होती. 19 नोव्हेंबर 2024 रोजी जवळपास दीड तास या मशिदीमधील व्हिडीओग्राफी करण्यात आली होती. तर 24 नोव्हेंबरला तीन तास व्हिडीओग्राफी केली गेली. तसेच जवळपास 1200 फोटो घेतले गेले. मात्र यानंतर वातावरण तापलं आणि बरंच काही घडलं. पण दोन दिवस केलेला सर्व्हेचा रिपोर्ट बंद लिफाफ्यात कोर्टात सादर करण्यात आला होता. या सर्व्हे रिपोर्टमधील काही गोष्टी समोर आल्या आहेत. जामा मशिदीत काही गोष्टी अशा आढळून आल्या आहेत की, पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. पण रिपोर्ट हा बंद लिफाफ्यात सादर केला गेल्याने त्याबाबत नेमकं स्पष्ट काहीच सांगता येत नाही. पण सध्या याबाबत चर्चांना उधाण आहे.
मशिदीत दोन वटवृक्ष आढळली आहेत. हिंदू धर्मात मंदिर परिसरात वटवृक्षाची पूजा केली जाते. त्यामुळे हे प्रमाण मानलं जात आहे. तसेच मशिदी परिसरात बावडी आढळली असून त्याचा अर्धा भाग आत आणि अर्धा भाग बाहेर आहे. बाहेरचा भाग झाकण्यात आला आहे. 50हून अधिक फुलांचे आकार आढळले आहेत. तसेच घुमटाकडचा भाग प्लेन केला आहे. मशिदीचे जुनं कन्स्ट्रक्शन बदलल्याचे बरेच पुरावे आढळले आहेत. आधीच्या शेपवर प्लास्टर करून रंगरंगोटी करण्यात आली आहे. मोठ्या घुमटाला एक चेन असून त्यावर झुंबर लटकलं आहे. अशा चैनचा वापर मंदिरात घंटा लावण्यासाठी केला जातो. ही सर्व माहिती सूत्रांच्या आधारे देण्यात आल्याने स्पष्ट असं काही सांगता येत नाही.
काय आहे शाही जामा मशिदीची कथा?
संभल शहराच्या कोट गर्वी भागात मुघलकालीन शाही जामा मशिद आहे. कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत या जागी पूर्वी हरिहर मंदिर असल्याचा दावा केला आहे. शाही जामा मशिद पुरातन वास्तू असून ही मशिद 1529 मध्ये मुघल बादशाह बाबरच्या आदेशाने मीर बेगने बनवली होती. कोर्टातील याचिकेत केलेल्या दाव्यानुसार, मशिद बनवताना हरिहर मंदिर तोडलं होतं. या आधारावर सुनावणी करताना कोर्टाने सर्व्हेचे आदेश दिले होते. दरम्यान, कलियुगात कल्की अवतार होणार असल्याचं हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं आहे. हा अवतार उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये होणार असल्याने या भागाचं पौराणिक महत्त्व आहे. दुसरीकडे, या भागात पौराणिक आधारावर विहिरींचा शोध देखील घेतला जात आहे. तसेच त्याचं खोदकाम सुरु आहे.