रामलला विराजमान झाले, आता सर्वसामान्यांना रामाचे दर्शन केव्हा घेता येणार ?
अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात मोठ्या धार्मिक सोहळ्यात प्रभू श्री राम विराजमान झाले आहेत. या मंदिराचे बांधकाम यावर्षअखेर संपणार आहे. तरीही श्री रामलल्लाचे दर्शन सर्वसामान्यांना काही नियम पाळून घेता येणार आहे. चला पाहूयात केव्हा रामाचे दर्शन आणि आरती होणार ते...
मुंबई | 22 जानेवारी 2024 : अयोध्येत सोमवारच्या शुभमुहूर्तावर रामलल्ला विराजमान झाले आहेत. प्रभू श्री रामाची प्राण प्रतिष्ठा पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर विधीवत मंत्रोच्चाराच्या घोषात झाली आहे. या क्षणाची रामभक्त कित्येक वर्षांपासून वाट पहात होते. तो क्षण अखेर आला आहे. आता सर्वसामान्यांना प्रभू रामाचे दर्शन होण्याचा क्षण दूर नाही. रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. आता सर्वसामान्य श्रद्धाळू रामलल्लाचे मनोभावे गर्भगृहात जाऊन दर्शन घेऊ शकणार आहेत. अयोध्येत सध्या प्रचंड गर्दी असल्याने आज सर्वसामान्यांना आज दर्शन दिले जाणार नाही. परंतू सर्वसामान्यांच्या मनात अखेर केव्हा प्रभू रामाचे दर्शन होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज आपण पाहूयात राम मंदिरातील प्रभू श्री रामाचे दर्शन सर्वसामान्यांना केव्हा मिळणार ते…
23 जानेवारीपासून दर्शन होणार
22 जानेवारीला सर्वसामान्य श्रद्धाळूंना अयोध्येतील राम मंदिरात दर्शन घेता येणार नाही. परंतू उद्या 23 जानेवारीपासून रामलल्लाचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. 23 जानेवारीपासून मंदिरातील काही भागात भक्तांना प्रवेश दिला जाणार आहे. परंतू या मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले नसल्याने संपूर्ण मंदिर पाहता येणार नाही. मंदिराच्या परिसरातील सर्व हॉटेल आणि लॉज बुक झाली असल्याने येथे जाताना तुम्हाला सर्व गोष्टींची खातरजमा झाल्यानंतरच जाता येणार आहे.
मंदिरातील प्रवेशाची वेळ
रामभक्तांसाठी सकाळी 7.00 वाजल्यापासून दुपारी 11.30 वाजेपर्यंत राम मंदिर खुले राहणार आहे. 11.30 वा. ते दुपारी 1.59 मंदिराच्या गर्भगृहाचे दरवाजे बंद रहाणार आहेत. दिवसा दुपारी 2 वाजल्यापासून सायं. 7 वाजेपर्यंत पुन्हा भक्तांसाठी राम मंदिर खुले रहाणार आहे. दुपारी अडीच तास राम मंदिराचे दरवाजे देवाच्या जेवण आणि विश्रांतीसाठी बंद रहाणार आहेत. दिवसातून तीन वेळी रामलल्लाची आरती केली जाणार आहे. पहिली जागरण श्रृंगार आरती सकाळी 6.30 वाजता होईल. दुसरी भोग प्रसाद आरती दुपारी 12.00 वाजता होईल आणि तिसरी संध्या आरती सायंकाळी 7.30 वाजता होणार आहे.
आरतीत सहभागी असे होता येईल
भगवान प्रभू श्री रामाच्या आरतीत प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी तुम्हाला पास काढावा लागेल. हा पास मंदिर ट्रस्टकडून तुम्ही घेऊ शकता. पास घेण्यासाठी तुम्हाला सरकारी ओळखपत्र सादर करावे लागेल. एकावेळी केवळ 30 भक्तांनाच या आरतीत सहभागी होता येणार आहे. अयोध्येतील राम भक्तांना रामलल्लाच्या दर्शनासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.