कथित दिल्ली मद्य घोटाळ्याचे सत्य माझे पती कोर्टाला सांगणार, पत्नी सुनीता केजरीवाल यांचा दावा
सुनीता केजरीवाल यांनी पतीच्या अटकेनंतर केंद्र सरकारविरोधात सोशलमिडीयावर एक पोस्ट केली होती. मुख्यमंत्री केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात 21 मार्च रोजी सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) अटक केली होती. पीएमएलए कोर्टाने त्यांना दुसऱ्या दिवशीच 28 मार्चपर्यंत रिमांडवर पाठविले आहे. केजरीवाल यांनी आपल्या अटकेला आव्हान देत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने कथित मद्य धोरण घोटाळ्यात अटक केली आहे. ईडी कोर्टाने केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. केजरीवाल यांच्या अपरोक्ष दिल्लीचे सरकार कोण चालविणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर कोठडीत असताना केजरीवाल यांनी मुख्यमंत्री या नात्याने आपल्या पाणी आणि जल नि:स्सारण मंत्र्यांना दिलेल्या आदेशाची देखील ईडीने चौकशी सुरु केली आहे. आता केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल कोर्टाला कथित मद्य घोटाळ्याचा पैसै कोठे गेला हे सांगतील आणि पुरावे देखील देतील असे सुनीता यांनी म्हटले आहे. दिल्लीच्या भल्यासाठी केजरीवाल यांनी दिलेल्या आदेशाची देखील सरकारने चौकशी सुरु केल्याचे सुनीता यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांची शुगर लेव्हल ठीक नाही. तुम्ही त्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा असे आवाहनही दिल्लीच्या जनतेला सुनीता केजरीवाल यांनी केले आहे.
काल आपण तुरुंगात अरविंद केजरीवाल यांना भेटायला गेली होतो. त्यांना डायबेटीज आहे. शुगर लेव्हल ठीक नाही. परंतू तरीही ते खंबीर आणि दृढनिश्चियी दिसले असे केजरीवाल यांची पत्नी सुनीता यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांनी दिल्लीच्या मंत्री आतिशी यांना संदेश दिला होता की दिल्लीकरांची पाणी आणि जल नि:स्सारण समस्या नीट हाताळा. यात काय वाईट केले. लोकांच्या समस्या दूर करायला नकोत का ? असा सवाल सुनीता केजरीवाल यांनी केला आहे. या वरुन केंद्र सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या लोकांना दिल्लीकरांच्या समस्येचे काही पडलेले नाही. त्यामुळे अरविंदजी यांनी खुप दु:ख झाल्याचे सुनीता केजरीवाल यांनी म्हटले आहे.
ईडीच्या अडीचशे धाडी परंतू….
कथित मद्य घोटाळ्यात ईडीने 250 हून अधिक धाडी मारल्या आहेत. कथित मद्य घोटाळ्यातील पैसे शोधले जात आहेत. आता पर्यंत कोणत्याही रेडमध्ये एकही पैसे सापडलेले नाहीत. संजय सिंह यांच्या येथे रेड मारली, मनीषजी यांच्याकडे रेड मारली. सत्येंद्र जैन यांच्या येथेही रेड मारली. एक पैसा मिळाला नाही. आमच्या घरी केवळ 73 हजार रुपये मिळाले असे सुनीता केजरीवाल यांनी सांगितले. कथित मद्य घोटाळ्याचा पैसा कुठे आहे? अरविंदजी याचा खुलासा 28 मार्चला कोर्टात करतील. साऱ्या देशाला सत्य सांगतील हा पैसा कुठे आहे. त्याचा पुरावे देखील देतील. माझा नवरा सच्चा आणि साहसी व्यक्ती आहे. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी लोकांनी प्रार्थना करावी असेही सुनीता भावूक होत म्हणाल्या. ते मला म्हणाले की माझे शरीर तुरुंगात आहे, परंतू आत्मा तुमच्या जवळ आहे. डोळे बंद कराल मी तुमच्याजवळच आहे असेही सुनीता यांनी मिडीयाला सांगितले. केजरीवाल यांच्या अटकेनंतर सुनीता केजरीवाल दुसऱ्यांदा मिडीयासमोर आल्या आहेत. यापूर्वी त्यांनी तुरुंगातून केजरीवाल यांनी पाठविलेला संदेश वाचून दाखविला होता.