मुलीच्या लग्नात नाचताना वडिलांना आला हार्ट अटॅक, खाली कोसळताच झाला मृत्यू
मुलीच्या लग्नात नाचताना वडिलांना हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जाणून घ्या कुठे आणि कशी घडली घटना.
अल्मोडा, उत्तराखंडमधील अल्मोडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या लग्नात नाचत असताना वडिलांना हार्ट अटॅक (Heart Attack in Marriage) आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लग्नाचा आनंद काही क्षणातच दुःखात बदलला. दुसरीकडे वधूच्या नातेवाईकांनी हल्दवणी येथे जाऊन शोकाकूल वातावरणात विवाह पार पाडला. यावेळी वधूच्या मामाकडून कन्यादान करण्यात आले. या हृदय हेलावणाऱ्या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा केला पंचनामा
मिळालेल्या माहितीनुसार, हल्दवानी येथील मीज हॉलमध्ये रविवारी लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विवाह सोहळा पार पाडण्यासाठी वधूपक्षातील लोकांना हल्दवणी येथे जावे लागले. याआधी मुलीच्या मेहेंदी, हळदीसह सर्व विधी तिच्या अल्मोडा येथील घरी केले जात होते. विधी दरम्यान लोक रात्री उशिरा नाचत होते. दरम्यान, वधूचे वडीलही नाचण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले.
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
दरम्यान, वधूचे वडील नाचत असताना अचानक कोसळले. त्यांना तात्काळ स्थानिक बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मुलीकडच्या मंडळींमध्ये शोककळा पसरली. मुलीचे हात पिवळे होण्याच्या काही तासांआधीच वडिलांचा मृत्यू झाला.
वधूच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासासाठी पाठवला आहे.
वधूच्या मामाने केले कन्यादान
दुसरीकडे, रविवारी मुलीच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. विवाह सोहळ्यासाठी वधूच्या मामासह इतर काही नातेवाईक हल्दवणी येथे रवाना झाले. हल्द्वानी येथे रात्री उशिरा वधूचा विवाह साधेपणाने पार पडला. यावेळी वधूच्या मामाने वधूचे कन्यादानही केले. लग्नानंतर वधूचे कुटुंब अल्मोडा येथे परतणार आहे. मुलीच्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले जातील.