अयोध्या राम मंदिरासाठी देणगी देताय तर सावध व्हा! सायबर गुन्हेगार करताहेत अशी फसवणूक

| Updated on: Dec 31, 2023 | 8:25 PM

राम मंदिर हा आता सायबर गुन्हेगारांना नवीन विषय मिळाला आहे. राम मंदिरासाठी देणगीच्या नावाखाली हे सायबर गुन्हेगार फसवणूक करत आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्यांच्या जाळ्यात अडकून कष्टाने कमावलेले पैसे लोक गमावत आहेत.

अयोध्या राम मंदिरासाठी देणगी देताय तर सावध व्हा! सायबर गुन्हेगार करताहेत अशी फसवणूक
Ram Mandir (1)
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

अयोध्या | 31 डिसेंबर 2023 : अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ येत आहे. देशात आनंदाचे वातावरण आहे. देशभरातून नव्हे तर जगातील अनेक देशातून रामलल्लाच्या उत्सवासाठी विविध वस्तू अयोध्येत पाठविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी राम मंदिराच्या नावाने देणग्या मागण्यात येत आहेत. पण, अशी देणगी देताना सावध राहा. राम मंदिर हा आता सायबर गुन्हेगारांना नवीन विषय मिळाला आहे. राम मंदिरासाठी देणगीच्या नावाखाली हे सायबर गुन्हेगार फसवणूक करत आहेत अशी माहिती समोर आली आहे. अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्या भव्य कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, सर्वसामान्यांना सावध करणारी एक बातमीही समोर आली आहे.

काही सायबर गुन्हेगार राम मंदिराच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहेत. राम मंदिराच्या नावावर दान मागत आहेत. यासाठी क्यूआर कोड दिला जात आहे. त्यांच्या जाळ्यात अडकून कष्टाने कमावलेले पैसे गमावत आहेत. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला.

सायबर गुन्हेगार राम मंदिरासाठी देणगीच्या नावाखाली फसवणूक करत आहेत. ते सोशल मीडियावर क्यूआर कोडसह संदेश पोस्ट करत आहेत. क्यूआर कोड स्कॅन करून लोकांना ते पैसे देण्यास सांगत आहेत. पण, हे पैसे फसवणूक करणाऱ्यांकडे जातात असे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी म्हटले आहे.

विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणतात, सायबर गुन्हेगारांनी सोशल मीडियावर मंदिराच्या नावाने देणगी मागणारे संदेश पाठवले आहेत. यामध्ये QR कोड देखील असतो. स्कॅन करून पैसे देण्यास सांगितले. क्यूआर कोड स्कॅन करून पाठवलेले पैसे फसवणूक करणाऱ्यांकडे जातात. त्याचप्रमाणे, काही लोकांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या नावाने बनावट आयडी बनविले आहे. त्याआधारे ते पैशांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

प्रवक्ते विनोद बन्सल यांनी यासंदर्भात गृह मंत्रालय, भारत सरकार, दिल्ली पोलिस, उत्तर प्रदेशचे डीजीपी, यूपी पोलिस आणि श्री राम तीर्थ न्यास यांना या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. तसेच हे प्रकरण गृह मंत्रालय, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पोलीस प्रमुखांना पाठवण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र आणि राम मंदिराच्या बांधकामावर देखरेख करणार्‍या ट्रस्टने कोणालाही निधी गोळा करण्याचा अधिकार दिलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केलंय.