लंडनमध्ये पत्रकार परिषद घेणारे आशिष रे कोण आहेत?
मुंबई : सईद शुजा नावाच्या सायबर एक्स्पर्टने लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन भारतातील 2014 ची निवडणूक ईव्हीएममध्ये छेडछाड करुन जिंकली असल्याचा दावा केलाय. यामुळे भारतातील राजकारण तापलंय. काँग्रेस नेते कपिल सिब्बल या पत्रकार परिषदेला उपस्थित असल्यामुळे भाजपने काँग्रेसवर देशाविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप केलाय. पण या सगळ्यामागे आणखी एक नाव आहे आणि ते म्हणजे आशिष रे.. त्यांनीच […]
मुंबई : सईद शुजा नावाच्या सायबर एक्स्पर्टने लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन भारतातील 2014 ची निवडणूक ईव्हीएममध्ये छेडछाड करुन जिंकली असल्याचा दावा केलाय. यामुळे भारतातील राजकारण तापलंय. काँग्रेस नेते कपिल सिब्बल या पत्रकार परिषदेला उपस्थित असल्यामुळे भाजपने काँग्रेसवर देशाविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप केलाय. पण या सगळ्यामागे आणखी एक नाव आहे आणि ते म्हणजे आशिष रे.. त्यांनीच या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आणि कपिल सिब्बल यांच्यासह इतरांनाही निमंत्रण दिलं होतं. रे यांनीच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सईद शुजाला कनेक्ट केलं होतं.
कोण आहेत आशिष रे?
आशिष रे सध्या भारतीय पत्रकार संघटना (युरोप) चे अध्यक्ष आहेत. ते काँग्रेसी असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केलाय. पण आशिष रे यांची ट्विटर टाईमलाईन आणि त्यांची पार्श्वभूमी पाहिली असता ते काँग्रेसचे समर्थक असल्याचं स्पष्ट दिसतं. शिवाय आशिष रे यांच्याशी वैयक्तिक मैत्री असल्याचं खुद्द कपिल सिब्बल यांनीही मान्य केलंय. रे यांच्या निमंत्रणामुळेच मी कार्यक्रमाला उपस्थित होतो, असं ते म्हणाले. आशिष रे काँग्रेसच्या नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्रासाठी लिहितात, असं रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं.
आशिष रे हे बोस कुटुंबातले आहेत. सुभाषचंद्र बोस यांच्याशीही त्यांचं नातं आहे. दार्जिलिंगमध्ये जन्मलेल्या रे यांनी वयाच्या 19 व्या वर्षी ऑल इंडिया रेडिओवर लाईव्ह कार्यक्रम केला. 1977 मध्ये बीबीसीसोबत काम करण्याची संधी मिळाली. याच कामासाठी ते लंडनला गेले आणि सध्या लंडनमध्येच राहतात. पत्रकार, लेखक आणि संशोधक अशी त्यांची ओळख आहे. अनेक पुस्तकंही त्यांनी लिहिली आहेत. नुकतंच त्यांनी ‘लेड टू रेस्ट: द कंट्रोवर्सी ओवर सुभाष चंद्र बोसे डिथ’ हे पुस्तकही लिहिलं होतं, ज्याला सुभाषचंद्र बोस यांची 75 वर्षीय मुलगी अनिता यांनी प्रस्तावना दिली होती.
आशिष रे यांचं काँग्रेस कनेक्शन
सुभाषचंद्र बोस जीवंत असल्याची माहिती काँग्रेसने लपवली असा आरोप नेहमीच करण्यात येतो. पण सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू तैवान विमान दुर्घटनेत झाला, असं सांगून काँग्रेसची बाजू घेण्यासाठी आशिष रे हे पुढे येतात, असं बोललं जातं. बोस कुटुंबातील अनेक सदस्य काँग्रेसच्या बाबतीत संवेदनशील आहेत. पण दुसरीकडे आशिष रे यांच्या मनात काँग्रेसविषयी सॉफ्ट कॉर्नर असल्याचं दिसतं.
आशिष रे आणि काँग्रेस कनेक्शन यासाठी रे यांची ट्विटर टाईमलाईन बोलकी आहे. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक धोरणांवर रे यांच्याकडून तीव्र शब्दात टीका केली जाते. आशिष रे यांचे अनेक ट्वीट ( @ashiscray) असे आहेत, ज्यातून ते काँग्रेसचे समर्थक असल्याचं दिसून येतं.
नॅशनल हेराल्डसाठी लिखाण
नॅशनल हेराल्ड हे काँग्रेसचं वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राशी आशिष रे यांचा संबंध असल्याचा आरोपही रवीशंकर प्रसाद यांनी केला होता. पण यामध्ये तथ्य असल्याचं दिसतं. कारण, नॅशनल हेराल्डच्या वेबसाईटवर गेल्यावर आशिष रे यांनी लिहिलेले अनेक लेख दिसून येतात. सरकारी संस्थांमधील वाद, राफेल प्रकरण यासह इतर अनेक लेख रे यांनी नॅशनल हेराल्डसाठी लिहिले आहेत.