ज्यांच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली, कोण आहेत ते भोले बाबा?

| Updated on: Jul 02, 2024 | 8:30 PM

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे. भोले बाबांच्या सत्संगाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. आतापर्यंत या घटनेत १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोकं जखमी आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी मुख्य सचिव आणि डीजीपी यांना हातरसला पाठवले आहे.

ज्यांच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली, कोण आहेत ते भोले बाबा?
Follow us on

हाथरसमध्ये एका सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याने 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. तर शेकडो लोकं जखमी झाले आहेत. ज्यांच्या सत्संगाला लाखो भाविक जमले होते ते भोले बाबा कोण आहेत असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. भोले बाबा म्हणून ओळखले जाणारे हे बाबा सध्या उत्तर प्रदेशात चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. त्यांचे सत्संग ऐकण्यासाठी हजारो लोकं येत असतात. त्यांचे लाखो अनुयायी आहेत. भोले बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबाचे खरे नाव सूरजपाल आहे. त्यांना लोकं आता हरी भोले बाबा म्हणून ओळखतात. भोले बाबा हे कासगंजच्या पटियाली गावचे रहिवासी असून त्यांनी तेथे आपला आश्रम बांधला आहे.

18 वर्षांपूर्वी पोलीस दलात होते कार्यरत

भोले बाबा हे आधी यूपी पोलिसात नोकरी करत होते. 2006 मध्ये त्यांनी यूपी पोलिसांच्या नोकरीतून व्हीआरएस घेतला होता. त्यानंतर ते त्यांच्या गावात राहू लागले. त्यांनी त्यानंतर हळूहळू गावोगावी जाऊन देवभक्तीचा संदेश देण्यास सुरुवात केली. ज्यासाठी त्यांना देणग्याही मिळू लागल्या. हळूहळू त्यांचा सत्संग आयोजित केला जाऊ लागला आणि ते उत्तर प्रदेशात आता लोकप्रिय झालेत.

भोले बाबा हे आपल्या पत्नीसह आसनावर बसून सत्संग देतात. तो अनेकदा पांढरा सूट पँट घालतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिथे जिथे भोले बाबांचा सत्संग असतो तिथे त्यांचे अनुयायी संपूर्ण व्यवस्था सांभाळतात.

चेंगराचेंगरीत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू

संत्संगच्या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाल्याने आज चेंगराचेंगरीत १०० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक आहे. सत्संगसाठी मोठा जनसमुदाय जमला होता. सत्संग संपताच लोक तिथून निघू लागले आणि यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीच्या वेळी लोकं एकमेकांवर पाय ठेवून जात होते. त्यामुळे अनेक जण जखमी देखील झाले.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेची माहिती मिळताच सचिव आणि डीजीपी यांना घटनास्थळी पाठवले. लोकांना तात्काळ मदत करण्याचे आदेश त्यांनी दिले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांना आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.