Eknath Shinde : कोण आहेत भूपेंद्र यादव ज्यांच्यावर महाराष्ट्रातल्या ऑपरेशन लोटसची जबाबदारी सोपवल्याची चर्चा आहे?
भूपेंद्र यादव हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्रीदेखील आहेत. श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा कारभार त्यांच्याकडे आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू म्हणूनही ते परिचीत आहेत.
मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातले वातावरण तापले आहे. कालपासून ते गुजरातमध्ये आहेत. त्यांना भेटण्यासाठी मिलिंद नार्वेकर शिवसेनेतर्फे चर्चेसाठी गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आहे. या सर्व घडामोडीमागे भाजपा असून राज्यात ऑपरेशन लोटस (Operation lotus) राबविणार आहे. या ऑपरेशन लोटसची जबाबदारी भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांच्यावर सोपवण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. भाजपाने याआधी विविध राज्यांत ऑपरेशन लोटसद्वारे सत्ता मिळवली होती. बहुमत नसतानाही भाजपाने सत्ता मिळवली होती. यात साम, दाम, दंड, भेद या सूत्रानुसार त्यांनी ही सत्ता मिळवली होती. यालाच लोटस ऑपरेशन असेही म्हटले गेले. आता हाच प्रयोग महाराष्ट्रात होत असल्याचे बोलले जात आहे.
कोण आहेत भूपेंद्र यादव?
भूपेंद्र यादव हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्रीदेखील आहेत. श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा कारभार त्यांच्याकडे आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू म्हणूनही ते परिचीत आहेत. 2010पासून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस, सर्वोच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्र यादव यांना केंद्रीय मंत्रिमंडळात 9 जुलै 2021रोजी बढती मिळाली. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. भूपेंद्र यादव राजस्थानमधून राज्यसभा खासदार म्हणून दुसऱ्यांदा कार्यरत आहेत.
पक्षाला मिळवून दिले यश
पक्षाच्या विविध पदांवर तर ते आहेतच. याशिवाय 2017 आणि 2020मध्ये बिहार आणि गुजरातमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाचे प्रभावी, यशस्वी नेतृत्व करणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. यादव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे विश्वासू सहकारी आहेत.
रणनीतीकार
राजस्थान (2013), गुजरात (2017), झारखंड (2014) आणि उत्तर प्रदेश (2017)च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपाला खात्रीशीर विजय मिळवून दिला. त्यात यादव हे निवडणुकीचे रणनीतीकार होते. 2020च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी यादव यांनी भाजपाचे प्रभारी म्हणून काम पाहिले. जुलै 2021मध्ये, यादव यांचा मोदी मंत्रिमंडळात पर्यावरण मंत्री म्हणून समावेश करण्यात आला.