संजय राऊत, सलमान खानला ज्याच्या नावाने धमकी, तो कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसेवाला याची गोळी मारून हत्या केल्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर आलं.
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थित शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका एसएमएसद्वारे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा इशारा देण्यात आल्याने खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि संजय राऊत यांना मिळालेली धमकी एकाच गुंडाकडून मिळाली की काय असा संशय व्यक्त केला जातोय. कारण संजय राऊत यांना धमकी देणाऱ्याने सलमान खानच्या धमकीचाही उल्लेख एसएमएसमध्ये केलाय. तसेच या संदेशात लॉरेन्स बिश्नोईचंही नाव समाविष्ट आहे. राऊतांना धमकी देणारा पंजाबमधील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आहे का, यावरून खळबळ माजली आहे.
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसेवाला याची गोळी मारून हत्या केल्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर आलं आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीतील तिहार जेलमध्ये आहे. तो जेलमधूनच गँगला मॅनेज करतो, असे म्हटले जाते. जेलच्या बाहेर त्याची गँग गोल्डी बराड आणि सचिन बिश्नोई हे सांभाळत असल्याचं म्हटलं जातं. हे दोघेही कॅनडातून इथली सूत्र हलवतात. त्यांच्या नेटवर्कमध्ये हजारो जण असून यात शार्प शूटर्स, कॅरीयर, सप्लायर, रेकी पर्सन, लॉजिस्टक स्पॉट बॉय, शेल्टर मॅन, सोशल मीडिया विंगचे सदस्य शामिल आहेत. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या केल्यानंतर या गँगने अनेकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सलमान खानने एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काळ्या हरिणाची शिकार केली होती. बिश्नोई समाज या हरिणाला देवासमान पूजतात. त्यामुळेच सलमान खानला अशी धमक्या दिल्या जात आहेत, असे म्हटले जाते. पंजाब विद्यापीठात शिक्षण घेताला लॉरेन्स बिश्नोईचे नाव विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले होते. मात्र विद्यार्थी संघटनेची निवडणूक हरल्यानंतर नेत्याकडून गुंडागर्दीकडे त्याचा प्रवास सुरु झाला.
संजय राऊत यांना काय धमकी?
शिवसेना खासदार संजय राऊत यांना याच बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी दिली गेल्याचं समोर आलं. धमकीच्या मेसेजमध्ये लिहिलय- हिंदू विरोधी, मार दूँगा तुझे. दिल्ली में मिल तू एके ४७ से उडा दुँगा, मुसेवाला टाइप. लॉरेन्सके और से मेसेज है.. सोच ले… सलमान और तू फिक्स असी धमकी या संदेशातून देण्यात आली आहे. राऊत यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त आणि विशेष आयुक्त यांना यासंबंधी माहिती दिली आहे.
‘झेड प्लस सुरक्षा द्या’
संजय राऊत यांना गेल्या काही महिन्यात चार ते पाच वेळा जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळे त्यांना झेड प्लस सिक्युरिटी तातडीने दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात जातीनं लक्ष घालावं. संजय राऊत हे वरिष्ठ नेते फक्त महाराष्ट्राचे नाही तर देशाचे नेते आहेत. आजकाल काहीच सांगता येतं नाही, हे दडपशाहीचं सरकार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.