नवी दिल्ली: श्रद्धा वालकर हिच्या हत्येमुळे केवळ दिल्लीच नव्हे तर महाराष्ट्र आणि संपूर्ण देशही हादरून गेला आहे. ज्याच्यावर विश्वास टाकला त्याच प्रियकराने हत्या केल्याचं उघड झालं आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी एकमेंकांना भेटले. एकमेकांच्या प्रेमात पडले. जगण्यामरण्याच्या आणाभाकाही घेतल्या. मुंबई सोडून दिल्ली गाठली आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. मग असं काय घडलं की तिचा प्रियकर आफताबने तिची हत्या केली?
आफताबने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबुल केल्याचं सांगितलं जातंय. श्रद्धा वालकरचे 36 तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर रोज रात्री 2 वाजता तिच्या शरीराच्या तुकड्यांचे काही भाग शहरातील विविध भागात कसे फेकायचं हेही पोलिसांना त्याने सांगितल्याचं समजतं.
सहा महिन्यांपूर्वी म्हणजे 18 मे रोजी लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या श्रद्धाची हत्या करण्यात आली. तिच्या मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी त्याने एक फ्रिज खरेदी केला होता. या मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये म्हणून तो सकाळ संध्याकाळ सेंटवाली अगरबत्ती लावायचा.
पोलिसांनी आफताबला शनिवारी अटक केली. त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आल्यानंतर त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
2019मध्ये मुंबईच्या एका कॉल सेंटरमध्ये श्रद्धा आणि आफताबची भेट झाली. याच ठिकाणी त्यांची मैत्री झाली. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. एवढंच नव्हे तर दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न करण्याचा निर्णयही घेतला.
मात्र, आफताब आणि श्रद्धाच्या कुटुंबीयांना हे नातं मंजूर नव्हतं. या लग्नाला आमचा विरोध असल्याचं दोन्ही कुटुंबाकडून सांगितलं गेलं. त्यामुळे या दोघांनीही प्रेमासाठी मुंबई सोडली. दिल्लीत आल्यानंतर दोघेही महरौलीतील एका फ्लॅटमध्ये लिव्ह इनमध्ये राहू लागले.
श्रद्धाचं संपूर्ण नाव श्रद्धा वालकर आहे. ती महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील रहिवासी आहे. मुंबईतील मालाडमधील मल्टिनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये ती काम करत होती. तिथेच तिची भेट आफताब अमीन पुनावालाशी झाली.
अफताबची अटक केल्यानंतर त्याने पोलिसांकडे गुन्हा कबूल केला आहे. श्रद्धा सातत्याने लग्नासाठी तगादा लावत होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिचं केवळ लग्न एके लग्नच सुरू होतं. त्यामुळे वाद झाला आणि वादाचं पर्यावसान हत्येत झालं.
आफताबची इतर मुलींशीही दोस्ती होती. त्यामुळे श्रद्धाला त्याच्यावर सतत संशय येत होता. याबाबत श्रद्धाने त्याला विचारलंही होतं. पण त्याने असं काही नसल्याचं सांगत आरोप फेटाळून लावले होते. 18 मेच्या रात्री दोघांमध्ये याच गोष्टींवरून कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर आफताबने त्याची हत्या केल्याचं चौकशीतून पुढे आलं आहे.
आफताबशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर श्रद्धाने कुटुंबीयांशी संबंध तोडले होते. ती घरच्यांचा संपर्कात नव्हती. फक्त लक्ष्मण नावाच्या एका वर्गमित्राच्या ती संपर्कात होती. त्यांच्याकडे ती सर्व गोष्टी शेअर करत होती.
त्याशिवाय श्रद्धा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह होती. ती सोशल मीडियावर सातत्याने तिचे फोटो शेअर करायची. सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह असल्याने तिथूनच तिच्या कुटुंबीयांना तिच्याबाबतची खबरबात मिळायची. त्याशिवाय लक्ष्मण सुद्धा तिची माहिती तिच्या कुटुंबीयांना द्यायचा.
पण मे महिन्यापासून श्रद्धाने सोशल मीडियावर एकही फोटो पोस्ट केला नाही. लक्ष्मणचा फोनही घेतला नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांचा संशय बळावला. तिचे वडील विकास वालकर मुलीची खबरबात जाणून घेण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी दिल्लीला गेले.
तिच्या घरी गेल्यावर घराला कुलूप लावलेलं होतं. त्यानंतर त्यांनी महरौली पोलीस ठाण्यात मुलगी गायब असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आफताबला अटक केल्याचं सूत्रांनी सांगितलं.