‘त्या’ खासदाराचं बोलणं ऐकून मोदींच्या डोळ्यातून अश्रू का तरळले?; तेजस्वी सूर्या यांनी काय सांगितलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरूत आले होते. तेव्हा मी त्यांचे चरणस्पर्श केले. तेव्हा त्यांनी मला उचललं आणि सांगितलं हे करायचं नाही. हे करू नका. राजकारणात असं करणं योग्य नाही, असं मला मोदी मला म्हणाले होते. आपण पक्षाचे एकच कार्यकर्ते आहोत, असं त्यांनी सांगितलं होतं. हे उदाहरण माझ्यासमोर आहेत, असं खासदार आणि भाजयूमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी सांगितलं.
नवी दिल्ली | 9 फेब्रुवारी 2024 : आम्ही निवडून आलो तेव्हा मोदी गटागटाने खासदारांना संबोधित करायचे. छत्तीसगड की झारखंडच्या एका खासदाराने त्याच्या राजकीय प्रवासाची माहिती दिली. ते ट्रेड युनियन होते. ते रोज अनेक किलोमीटर अनवाणी चालत होते. जेव्हा हा खासदार सांगत होता, तेव्हा मोदींच्या डोळ्यात लगेच अश्रू तरळले होते. मोदी पूर्णपणे भारावून गेले होते. मोदींची गरीब, दलित आणि सोशितांबद्दलची कमिटमेंट ही रिअल आहे, असा किस्सा खासदार आणि भाजयूमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी सांगितला. ते सुशासन महोत्सवात बोलत होते.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने सुशासन महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी खासदार आणि भाजयूमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून सुशासनाचं महत्त्व अधोरेखित केलं. सुशासनाचा थेट देशातील तरुणांवर परिणाम होत असतो. त्यामुळे या सुशासनाचं महोत्सवाचं महत्त्व अधोरेखित होतं. केवळ राजकारणातच नव्हे तर पार्टीतही सुशासन असलं पाहिजे, असं तेजस्वी सूर्या यांनी सांगितलं.
आज देशाच्या अर्थव्यवस्थेचं लोकशाहीकरण झालं आहे. 27 व्या वर्षी एक तरुण बिलेनियर झाल्याचं मी ऐकलं. गेल्या दहा वर्षात तुम्ही गुड गव्हर्नस पाहिलं आहे. आपण डिजीटल ट्रँझॅक्शन केलं. अमेरिका जेवढं ट्रँझॅक्शन तीन वर्षात करतो, ते आपण एका वर्षात करतो. आपण डिजीटल ट्रँझेक्शनमध्ये सुपर पॉवर झालो आहोत. काँग्रेस काळात जेवढे जनधन अकाऊंट उघडले नाहीत, त्यापेक्षा किती तरी पटीने मोदी सरकारने काढले आहेत, असं तेजस्वी सूर्या म्हणाले.
आजचे तरुण आत्मविश्वासू
आजचे युवा आत्मविश्वासू आहेत. ही मोठी गोष्ट आहे. तुम्ही संघर्ष केला तर तुम्ही पुढे येऊ शकता. प्रगती करू शकता हे आज सिद्ध होतंय. तरुण त्याचा अनुभव घेत आहेत. युवा मोर्चामुळे आम्हाला देशातील आणि देशाच्या बाहेरच्या लोकांशी संवाद साधता येत आहे. भारताला चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचं काम परदेशात मोठ्या प्रमाणात झालं आहे. अनेक देशाचे लोक येत असतात. ते या प्रचाराचे बळी पडले आहेत, असंही सूर्या यांनी सांगितलं.